महाराष्ट्राने भाजपचा आणि मोदींचा खुळखुळा साफ केला; संजय राऊत यांचा वज्राघात

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा मुंबईत षण्मुखानंद सभागृहामध्ये झाला. शिवसैनिकांच्या गर्दीने खच्चून भरलेल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे धारदार भाषण झाले. संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा समाचार घेतला.

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा हा दिवस आहे. 19 जून 1966 या दिवसाला जे महत्त्व होतं ते आज 19 जून 2024 लाही तेच महत्त्व आहे. असं वाटतंय की शिवसेनेने फक्त पुनर्जन्मचं घेतलेला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण राखेतून पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातली आहे. एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण येथे आलोय. आणि त्या विजयाचे नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला. तसाच जे लढले, संघर्ष केला, हार मानली नाही, लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही. हे मोदी-शहा या दोन आक्रमणकाऱ्यांना ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं असे माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतोय. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी चारशे पार घेऊन येणारच, तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जन्माला येतानाच ते चारशे खुळखुळे हातात घेऊन आले होते. त्या भाजपचा आणि मोदींचा खुळखुळा साफ जर कोणी केला असेल तर तो आपल्या उद्धवसाहेबांनी आणि महाराष्ट्राने करून दाखवला, असा वज्राघात संजय राऊत यांनी केला.

‘शिवसेना संपवण्याचे स्वप्न कोणी पाहू नये’

शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकराने हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही कितीही रेडे कापा, तुम्ही आमच्यावर कितीही आघोरी प्रयोग करा ते आमच्यावर चालणार नाहीत. आज त्या डोममध्ये डोमकावळे जमले आहेत. डोमकावळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58 वा वाढदिवस आहे आणि ते अडीच आहेत. पुढच्या वर्षी त्यांच्या जीवनामध्ये अडीच वर्षेही नसतील. आजचा 58 वा आहे उद्या हिरक महोत्सव येईल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान आणि राष्ट्राभिमानाचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. असे कोणी गुजरातचे सोमे गोमे, हौशे नवशे गवशे आले. आणि शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवण्याचे स्वप्न कोणी पाहू नये, असे संजय राऊत ठणकावून सांगितले.

‘महाराष्ट्राने तुम्हाला झिडकारलं, लाथाडलं, नाकारलं’

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मान कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकवली नाही. त्याच शिवसेनेचा आणि त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धवसाहेब यांनी चालवला. फार मोठं यश त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे, याचं मला आश्चर्य आहे. कशा करता? महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल? नरेंद्र मोदींना बहुमतमुक्त केल्याबद्दल? धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात आणि देशात काढणार? 400 करणार होते ते आम्ही 240 च्या खाली आणून ठेवले म्हणून आभार. यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी हा ब्रँड होता, बहुतेक आता मोदी ब्रँडी झाली आहे. ते नशेत आहेत. आता जे ब्रँडीचे दोन-दोन घोट हे मारताहेत, आता काय तो ब्रँड राहिला नाही. ही आता देशी ब्रँडी झाली आहे. त्या ब्रँडीच्या नशेत त्यांना असले काही थेरं सुचताहेत. आभार यात्रा कसली? तुमचा पराभव झाला आहे. तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलं, लाथाडलं, नाकारलं आहे, असे म्हणत संजय राऊत भाजपवर बरसले.

जिथे-जिथे राम तिथे-तिथे त्यांचा पराभव

उत्तर प्रदेशात प्रभूश्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली. श्रीरामाचा फोटो छोटा ठेवला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना प्रभूश्रीरामाची आहे की मोदींची? चार तास टीव्ही पाहत होतो. मला प्रभूश्रीरामाची मूर्ती दिसली नाही. फक्त मोदीच दिसत होते. रामाने लाथ घतल्यावर आता मोदींना राम दिसला असेल. देशाच्या जनतेने, महाराष्ट्राने, उत्तर प्रदेशने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगी हिंदुत्व होतं. महाराष्ट्रात त्यांना सट्टा लागला. पण हा त्यांचा शेवटचा आकडा आहे. यानंतर त्यांचा आकडा महाराष्ट्रात लागणार नाही. हा सट्टा बाजार, शेअर बाजार नेहमी तात्पुरता असतो, तो कधीही कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आणि महाराष्ट्रतही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट? स्ट्राईक रेट महाराष्ट्रात वाढला आहे, तुमच्या बेईमानीचा आणि गद्दारीचा. आणि तो आम्ही खाली आणू. सात जागा मिळाल्या. त्यातली अमोल किर्तिकरांची जागा ही आपण जिंकलेली जागा आहे. ती जागा आपण पुन्हा जिंकू. देशात भाजपच्या 110 जागा या पाचशे ते हजारच्या फरकाने जिंकलेल्या आहेत. म्हणजे तो विजय मानता येणार नाही. जसा अमोल किर्तिकरांचा विजय चोरला तसे हे 110 विजय त्यांनी चोरले. नाहीतर भाजप हा 120 वर अडकला आहे. 120 च्या पुढे भाजप गेलेला नाही. लोक म्हणतात नरेंद्र मोदी हरलेच होते. अमोल किर्तिकरांप्रमाणे त्यांचा विजय खेचून आणला. देशाचे पंतप्रधान पाच फेऱ्यांत पहिले तीन तास पिछाडीवर होते. जिथे-जिथे हिंदुत्व जिथे-जिथे मंदिरं तिथे-तिथे भाजपचा पराभव झाला आहे, हे लक्षात घ्या. वाराणसीत हरता हरता वाचले. अयोध्येत हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, नाशिकला पंचवटीला हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव झाला. हे यांचं हिंदुत्व आहे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

ही पैशाची मस्ती चालणार नाही. आता काय ते वारकऱ्यांनाही लाच द्यायचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेट संघांना पैसे द्या, मंडळं विकत घ्या. विजय विकत घ्या. वारकऱ्यांनाही प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये द्यायचे. म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्यायचं. वारकरी महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना चांदीच्या ताटात नजराणा पाठवला होता. तो नजराणा तुकोबारायांनी परत पाठवला. आम्ही नेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येरे तुमचे वित्त धनं मज मृती के समान… हा तुमचा नजराणा आम्हाला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत आम्हाला राजाचे नजराणे नकोत, असे त्यांनी सांगितले होते. पण या महाराष्ट्रात हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धवसाहेबांनी आपल्याला हा विजय मिळवून दिला आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

‘शिंदे-अजित पवार हे मृगजळ’

आज आपण फार काही मोठा सांस्कृतीक कार्यक्रम ठेवला नाही. तो पाहायचा असेल तर डोमकावळ्यांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे. या निवडणुकीने आपल्याला एक चांगला संदेश दिला आहे. आपण तो प्रखर हिंदुत्ववादी म्हणून स्वीकारला पाहिजे. हा संदेश सगळ्यांना आहे. महाभारत आणि रामायण हे आपले दोन पवित्र ग्रंथ आहेत. रामायणाने सांगितलं सोन्याचं हरिण नसतं, मृगजळाच्या मागे लागू नका. शिंदे-अजित पवार मृगजळ आहेत. आणि महाभारतानं संदेश दिला, सत्तेची मस्ती चालणार नाही. बहुमताची दादागिरी चालणार नाही. तुम्हाला कधीही खाली उतरवलं जाईल आणि तुमचा सत्यानाश होईल. हे दोन संदेश या निवडणुकीने आपल्याला दिले, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

‘त्या चार खांद्यांपैकी एक महत्त्वाचा खांदा उद्धवसाहेब तुमचा’

महाभारताच्या 13 व्या अध्यायात एक छान प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. संपूर्ण पृथ्वीवर वाताहत झालेली आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे-जे काही सुरू आहे ते दाखवलं. हाणामाऱ्या, संघर्ष, पक्षांतरं, फोडाफोडी, सत्तेची खेचाखेची, विश्वासघात, ईडी, सीबीआय, मोदी-शहा हे सगळं श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं. हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला. मग अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, हे असंच चालणार असेल तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर? माझ्या खांद्यावर असं उत्तर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं नाही. या जगात चार अशी प्रमाणिक माणसं आहे जे या समाजाच्या देशाच्या कल्याणाचा विचार करतात. राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात, त्यांच्या खांद्यावर हे जग तरेल. आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्त्वाचा खांदा उद्धवसाहेब तुमचा आहे. म्हणून हे जग तरलेलं आहे, म्हणून हा समाज तरलेला आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे. या महाराष्ट्राचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आशेने आपेक्षेने पाहतोय, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.