संपूर्ण देश चार तारखेला ‘डि-मोदीनेशन’ करणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मोदीजी जसं अचानक येऊन तुम्ही संपूर्ण देशात डिमॉनेटायझेशन लागू केलं तसंच चार तारखेला संपूर्ण देश डि-मोदीनेशन करणार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली येथे झालेल्या सभेत केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कान्होजी जेधे मैदानात पार पडली. संध्याकाळी सहाच्या सुमारास या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र उद्धव ठाकरे यांनी वाऱ्या पावसाची तमा न बाळगता भर पावसात त्यांची वाट पाहणाऱ्या जनतेसमोर सभा घेत खणखणीत भाषण केलं. ‘मोदीजी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करता आणि इथे गद्दारांची पोरं कडेवर घेऊन फिरता”, असा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपांचा समाचार घेतला.

”आजचा पाऊस हा मतांच्या रुपाने आपल्यावर बरसणार आहेत. आपल्या सभेवर पाऊस पाडण्यासाठी देखील काही लोकं गुवाहटीला गेले असतील. तिथे जाऊन काय कापले असेल माहित नाही. पण जनता या निवडणूकीत तुम्हाला गाडणार आहे. मी आणि संजय राऊत हेलिकॉप्टरमधून येत होतो. संपूर्ण रस्ते यांनी होर्डिंग्जने बरबटून टाकले आहेत. हे होर्डिंग्ज मोजा आणि त्याचा हिशोब किती झाला ते खोकेबाजांना विचारा. वैशाली ताईंना मी उमेदवारी दिली कारण मला शिवसेनेची शक्ती या गद्दारांना दाखवायची आहे. त्यांना ते वाटतं की ते म्हणजे शिवसेना. या सगळ्या साध्या लोकांनी या गद्दारांना मोठं केलं आणि मोठे झाल्यावर हे गद्दार झालेत. हुकुमशहासमोर झुकलात, शेपूट घातलीत. पण तुम्ही शिवसेना संपवू शकत नाही. यांना जर एवढी विजयाची खात्री असती तर विश्वगुरु मोदी माझ्या एका मध्यमवर्गीय महिलेचा पराभव करण्यासाठी कल्याणमध्ये आले नसते. मोदीजी तुम्ही मणिपूरमध्ये नाही गेलात. जिथे महिलांवर अत्याचार झाले तिथे नाही गेलात. पण माझ्या महिला कार्यकर्तीच्या पराभवासाठी गद्दाराच्या प्रचाराला आलात. मोदीजी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करता. यांना शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही नाही चालत. पण गद्दारांची पोरं तुम्ही कडेवर घेऊन फिरता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गद्दारांच्या पोराला तुम्ही पुन्हा उमेदवारी दिली. जर घराणेशाहीचं एवढं वावडं असेल तर याला उमेदवारी द्यायला नको होती. जर द्यायचीच होती. तर ज्यांच्यामुळे भाजपची ओळख निर्माण झाली त्या प्रमोद महाजन यांच्या लेकीला उमेदवारी का दिली नाही. हाच का तुमचा भाजप? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

”मला सर्व भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की ही भाजपची वाटचाल तुम्हाला मंजूर आहे का? मोदींनी पंचवीस सभा महाराष्ट्रात घेतल्या. जेवढा रामाचा जप नाही केला तेवढा उद्धव ठाकरे यांचा केला असेल त्यांनी या काळात. या सगळ्या भाषणांमध्ये बाईवर बोलले पण महागाईवर कधी बोलले आहेत का? आरोग्यव्यवस्थेवर, रोजगारावर बोलले नाहीत. दररोज उठतात नवनवीन विषय शोधतात. मोदींचं भाषण लिहून देणारा संपावर गेला असेल. म्हणून पुन्हा तेच तेच वाचतायत”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला.

”हा जो कल्याण लोकसभा मतदार संघ आहे. यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. याच मतदारसंघातील एकाचे आमदार गणपत गायकवाड यांना कधी विचारलं का तुम्ही की त्याला गोळीबार करण्याची वेळ का आली. गणपत गायकवाडांनी टिव्हीवर सांगितलं की मिंध्यांच्या हातात सरकार राहिलं तर महाराष्ट्रात गुंडाराज येईल. काही व्यवहारांमध्ये गायकवाडांचे करोडो रुपये मिंध्याकडे आहेत. त्यांच्या या आरोपांनंतर का नाही पाठवलं सीबीआय, ईडीला मिंध्यांकडे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे हे सगळे उपरे तुम्ही मांडिवर घेतले व भाजपच्या आमदाराला तुरुंगात टाकलात. आम्हाला कळलं पाहिजे यात नक्की गुन्हेगार कोण आहे. भाजपच्या राज्यात भाजपच्या आमदारांवर ही वेळ आली. जर पुन्हा हे गद्दार निवडून आले तर काय आतंक माजेल याचा विचार करा. हाच आतंक संपवायला मी इथे आलोय. मला हे शिवसेनेची ताकद काय ते दाखवून द्यायची आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”मोदीजी म्हणातात छोटे प्रादेशिक पक्ष कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. 25 वर्ष तुमच्या सोबत असताना तुमच्यात नाही विलीन झालो मग काँग्रेसमध्ये का विलीन होऊ? आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता मग चंद्राबाबू, नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत का? चंद्रबाबूंनी अल्पसंख्यांकांसाठी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत त्याच्याशी मोदीजी तुम्ही सहमत आहेत का ते सांगा. मला सांगता सावरकरांवर बोला, पण पहिलं तुमचं ढासळतंय ते सावरा…. बोलायचं झालं तर मी श्यामा प्रसाद मुखर्जींवर बोलू शकतो. पण त्याने लोकांना काय मिळणार. त्याने महागाई कमी होणार, गॅस डिझेलच्या कशा किमती कमी होणार. मोदीजी तुम्ही तुमची पूर्वीची भाषण काढून ऐका. गॅस सिलिंडर 2014 ला चारशे होता. आता हजाराच्या पार गेलाय. या सगळ्या भूल थाापा आता बस झाल्या. आमचं तर विलीनीकरण होणार नाही. पण मला काळजी वाटतेय ती भाजपची. या चार तारखेला मोदीजी पंतप्रधान नसणार. मोदीजी काही वर्षांपूर्वी तुम्ही डिमोनेटायझेशन केलेलं तसं संपूर्ण देश चार तारखेला डिमोदीनेशन करणार आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

”मोदीजींनी आतापर्यंत महाराष्ट्रात 25 सभा घेतल्या. उद्या पण घेणार आहेत. मी म्हणतो परवा पण घ्या. पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रात तुमच्या या शेवटच्या सभा आहेत. चार तारखेला यांची सत्ता जाणार. भाजपचं काय होणार मला माहित नाही. तुम्ही म्हणालेलात की वयाच्या 75 नंतर राजकारण्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर शब्दाचे पक्के असाल तर मोदीजी तुम्ही दोन वर्षांनी 75 वर्षांचे होणार आहात. त्यानंतर तुम्ही तुमचा झोला उचलून जाल. पण त्यानंतर भाजपचे काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे भाजपकडे. दोन वर्षानंतर तुम्ही गेल्यावर भाजपचं काय होणार हा प्रश्न मला पडलाय? असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना व भाजपला लगावला.

”डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे. ज्या भाषेत मोदीजी बोलतायत ते तुम्हाला मान्य आहे का? मला नकली संतान बोलतात ते तुम्हाला मान्य आहे का? कठिण काळात संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिली. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. भाजपचे जे अस्सल नेते आहेत त्यांना हे पटतंय का? रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीच्या विचारसरणीत मोठे झालेल्या नेत्यांना हे पटतंय का? ती संस्कारी पिढी होती त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आज यांचं जे काही सुरू आहे तळ्यात मळ्यात. कधी मला नकली संतान म्हणायचं दुसऱ्या दिवशी मला डोळा मारायचा. काय परिस्थिती झाली आहे यांची. त्यांच्या भाषणात काल आज काही कळत नाहीए. या गजनी सरकारच्या हातात तुम्ही देश देणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी जनतेला केला.