महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरव आणि परंपरेचा दिमाख… शिवसेनेचा विराट दसरा मेळावा; शनिवारी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग

पाच दशकांहून अधिक काळ शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात होत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरव आणि परंपरेचा दिमाखच… केंद्रातील मोदी-शहांचे सरकार आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे. महाराष्ट्र धर्मावर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱया दसरा मेळाव्याबद्दल राजकीय पक्षांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि महाविकास आघाडीवर मतांचा वर्षाव केला होता. सद्य राजकीय परिस्थिती आणि जनमत पाहता विधानसभा निवडणुकीतही तोच ट्रेन्ड कायम राहील, असा राजकीय तज्ञांचा व्होरा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि शिवसेनेत जोरदार सुरू असलेले इनकमिंग पाहता दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी विक्रमी गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेना नेते आणि पदाधिकारी मेळाव्याची जय्यत तयारी करत आहेत.

– शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ सज्ज होत आहे. भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. व्यासपीठाच्या बॅकग्राऊंडला शिवसेनेची धगधगती मशाल असेल. सुमारे सवा लाख लोकांसाठी आसन व्यवस्थेची तयारी केली जात आहे.

मशाल धगधगणार… महाराष्ट्र जिंकणार

दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱयांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यंदाचा दसरा मेळावा अविस्मरणीय ठरेल, असा सर्वांनाच विश्वास आहे. महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध उद्धव ठाकरे यांची तोफ दसरा मेळाव्यात धडाडणार आहे. दसरा मेळाव्याचे दोन टिझर शिवसेनेच्या वतीने रिलिज करण्यात आले आहेत. त्याला सोशल मीडियावर लाखो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहे. टिझरमधून ‘मशाल धगधगणार… महाराष्ट्र जिंकणार,’ अशी शिवगर्जना करण्यात आली आहे.