विधानसभेसाठी शिवसेनेची व्यूहरचना; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना ठरवण्यासाठी शिवसेनेची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. निवडणुकीत शिवसेनेकडून लढवल्या जाणाऱ्या जागांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  आगामी निवडणुकीत कोणत्या जागा शिवसेना खात्रीने लढवू शकते तसेच ज्या जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत अशा जागांबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, शिवसेना आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते, अशीही माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

आमचा अभ्यास पक्का झाला

आगामी निवडणूक महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रपणे लढवणार आहेत. तीनही पक्षांनी आपापल्या जागा आहेत त्यासंदर्भात अभ्यास व चिंतन केले पाहिजे आणि मग महाविकास आघाडीची संयुक्त बैठक घेऊ, असे ठरले आहे. त्यानुसार शिवसेनेचा अभ्यास पक्का आहे आणि आमचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.