सरकारी तिजोरी सर्वसामान्यांच्या खिशातून भरण्यासाठी राज्य सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टँपपेपर बंद केल्याने सोमवारपासून अगदी लहान कामांसाठीही थेट 500 रुपयांचे स्टँपपेपर विकत घ्यावे लागत आहेत. मिंधे सरकारने घेतलेला हा निर्णय 16 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला आता मोठी कात्री लागणार आहे.
त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ट्विटरवरून मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ”एकीकडे फुकटच्या खिरापती वाटायच्या आणि दुसरीकडे अवाच्या सव्वा किंमती वाढवून त्याच जनतेकडून वसूल करायचं हेच मिंधे-भाजप सरकारचं धोरण आहे. प्रत्येक नागरिकाला छोट्या-मोठ्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या स्टॅम्प पेपरची किंमत 100 रुपयांवरून थेट 500 रुपये करण्यात आली आहे. ही तर सर्वसामान्य जनतेची सरळसोट लूट आहे” असे ट्विट शिवसेनेने केले आहे.
एका हाताने दिले दुसऱ्या हाताने लुटले
राज्याती महायुती सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार हे सरकार सध्या करीत आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. योजनेच्या जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. इतर योजनांना कात्री लावूनही जाहिरातींसाठी सरकारला पैसे अपुरे पडत आहेत. म्हणूनच मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे. महागाई वीज दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आणि त्यात आता मुद्रांक शुल्कासाठी 500 रुपये द्यावे लागणार आहेत अशी टीका आता या सरकारवर होऊ लागली आहे.