मोदी सरकारला वीर सावरकर व बाळासाहेबांचा विसर का? भारतरत्नवरून संजय राऊत यांनी खडसावलं

केंद्र सरकारने गेल्या एका महिन्यात पाच जणांना भारतरत्न जाहीर केले. यात बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग,माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भाररतरत्न सन्मान जाहीर झाले. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यांचे मोदी सरकारला विस्मरण झाले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

”हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केले… निवडणुकांची धामधूम दुसरे काय?, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भारत हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले. त्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.