शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण; पैठणमध्ये 15 सप्टेंबर रोजी विविध प्रकल्पाचे होणार भूमिपूजन

पैठण येथे 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी विविध कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आणि विविध प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आयोजक तथा चेअरमन सीए सचिन घायाळ यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.

या सभेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे उपस्थित राहणार आहेत. संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सीए सचिन घायाळ हे संचालक मंडळ व हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार असून, संत एकनाथ कारखान्याच्या विस्तीर्ण मैदानावर भव्य व्यासपीठाची उभारणी केली जात आहे. सभास्थळी येणाऱ्या सर्व मार्गांवर दुतर्फा भगवे झेंडे, पताका व स्वागत कमानी व पाचोड, शेवगाव, शहागड व छत्रपती संभाजीनगर मार्गावर स्वागत फलके लावली.

विशेष म्हणजे पैठण शहरातील मुख्य बाजारपेठेतून चेअरमन सीए सचिन घायाळ, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी 300 कार्यकत्यांसह पदयात्रा काढली व 3 हजारांपेक्षा अधिक दुकानदार, व्यावसायीक व फिरत्या विक्रेत्यांना प्रत्यक्ष भेटी घेऊन निमंत्रण पत्रिका वाटप केल्या आहेत. या सभेला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

विविध विकास प्रकल्पाचे होणार भूमिपूजन

या सभेपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संत एकनाथ साखर कारखान्याच्या खालील विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 1 लाख लिटर क्षमतेचा इथॉनेल प्रोजेक्ट, 20 एम. डब्ल्यू. क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प, 5 हजार टन क्षमतेचा सहायक साखर कारखाना, नवीन सोलार निर्मिती प्रकल्प, दाणेदार पोटॅश खतनिर्मिती प्रकल्प, मळीपासून बी. आय. ओ. आणि सीएनजी निर्मिती प्रकल्प आदी. याशिवाय तयार झालेल्या मंगल कार्यालयाचे लोकार्पण केले जाणार आहे.