राज्यातील आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटरवर’, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली ‘शिव आरोग्य सेवा’ ही आदिवासी आणि वाड्या-वस्त्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. यापुढेही ती अधिक सुदृढ करून, जनतेच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार विनायक राऊत यांनी केले. दरम्यान, स्वार्थासाठी खुर्चीवर बसलेल्यांकडून महाराष्ट्राचे कसलेही भले होणार नाही. सत्तेत राहून सरकारी निधी आणि यंत्रणेचा गैरवापर होत आहे. आरोग्यमंत्री पदाला लायक नसल्यानेच कोल्हापूर, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी औषधांचे घोटाळे समोरे येत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणेचाच बोजवारा उडाला असून, ती ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सत्ताधाऱ्यांचा हा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणण्याचे आवाहन खासदार राऊत यांनी शिवसैनिकांना केले. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आज शिवसेना आरोग्यसेवा मेळावा झाला. यावेळी शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत बोलत होते.

कोरोनाकाळात मुख्यमंत्री म्हणून जनतेची जबाबदारी घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून कोरोनाग्रस्तांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी घेतली. त्यांच्या या क्रांतिकारी कामाची दखल संपूर्ण देशासह जगाने आणि जागतिक आरोग्य संघटनेकडूनही घेण्यात आली. ‘कोरोनाकाळात दीड लाख मृत्यू होतील,’ असे भविष्य सांगत बसणाऱ्या भाजप नेत्यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगत खासदार विनायक राऊत यांनी सध्याच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कारभाराचा चांगलाच पंचनामा केला.

‘सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्या डोक्यावर दिल्लीचा हात राहत नाही. कोरोनाकाळात जनतेचा जीव वाचविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. तुमच्या उत्तर प्रदेशने केले आहे काय? गंगेत हजारो मृतदेह फेकण्यात आले. त्यावर कधी बोलणार?’ असा सवाल करीत, ‘करोडोंचे खोके घेऊन तुम्ही आला असला, तरी आमच्याकडे करोडो लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत,’ याकडे खासदार विनायक राऊत यांनी लक्ष वेधले.

यावेळी उपनेते-जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, राज्य सचिव डॉ. अजित पाटील, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगुले, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, मंजित माने, दत्ता टिपुगडे, विराज ओतारी, दिलीप देसाई, राजू सांगावकर, विनोद खोत, उदय जाधव, दिनेश साळोखे, रणजित आयरेकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीत जनताच भाजपला जागा दाखवेल

‘स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप वाढला; पण त्यांना न जुमानता, संधी न देता इतर पक्षांतील आमदार-खासदारांना फोडून आपल्याकडे घेतले. अशा भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपच्या नेतृत्वाला या निवडणुकीत जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशाराही खासदार विनायक राऊत यांनी दिला.

आरोग्यमंत्रीच भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत आहेत

‘आरोग्य घालत आहेत खात्याचे ज्ञान नसलेले आरोग्यमंत्री असल्याने या खात्यातून जेवढे शक्य आहे, तेवढे ओरबाडायचे काम सध्या सुरू आहे. एकीकडे ‘शासन आपल्या दारी’सारख्या अनेक कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च केले जात आहेत; पण आरोग्यसेवेवर खर्च होताना दिसत नाही. आजसुद्धा जिल्हा रुग्णालयात तापाच्या गोळ्या मिळत नाहीत. ‘इनिमा’सारखे औषध नाही. डॉक्टरांचे वेतन सहा-सहा महिने प्रलंबित आहे. कोरोनाकाळात काम केलेल्या आरोग्यसेविकांचा पगार अजूनही मिळालेला नाही. मग हे कसले दावे करतात?’ असा सवाल करीत, सर्वांना वाऱ्यावर सोडण्याचे काम या सरकारने केले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ससूनमधून ड्रग्जचे रॅकेट चालविले जात असल्याचे समोर आले. स्वतः मुख्यमंत्री शिंदे राहत असलेल्या परिसरातील कळव्याच्या जिल्हा रुग्णालयात अनेकांना जीव गमवावा लागला. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासह नागपूर, पुणे येथील रुग्णालयातील औषध साहित्य खरेदीत झालेले कोट्यवधींचे घोटाळे आणि यातील भ्रष्ट लोकांना आरोग्यमंत्रीच पाठीशी घालत असल्याने भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, हा विभागच ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचा गंभीर आरोपही खासदार विनायक राऊत यांनी केला.