मणिपूरच्या राम मंदिरातही शिवसेना आरती करणार, मोदी तिथे येणार का? संजय राऊत यांचा सवाल

बेइमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत. रस्त्यावर नाचत आहेत. निर्णय खरा की खोटा हे त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारावे.  त्यासाठी काय आणि कसे उपद्व्याप करण्यात आले? आमची बाजू सत्य आणि न्यायाची असून आम्ही लढू. शिवसेना अशा अनेक संकटांतून तावून सुलाखून बाहेर पडलेली आणि उजळून निघालेली आहे. यावेळीही तसेच होईल.

मणिपूरमध्ये एक राम मंदिर असून तिथेही जाऊन शिवसेना आरती करणार आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे यावं आणि रामाची आरती करावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या नाशिक दौऱ्यावर निशाणा साधला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहेत. हा कार्यक्रम शिवसेनेने आधीच जाहीर केला आहे. ते पाहून भाजप आता पंतप्रधान मोदींनाही काळाराम मंदिरात आणत आहे. जिथे जिथे शिवसेना जाते तिथे तिथे ते येत आहेत. मग आम्ही आता मणिपूरच्या राम मंदिरातही आरती करणार आहोत, तिकडे मोदी येणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदे भाजपच्या हुकूमशाहीचे पुरस्कर्ते आहेत, महाराष्ट्र लुटणाऱयांच्या टोळ्यांचे पुरस्कर्ते आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेला गुजरातच्या लॉबीद्वारे इतिहासजमा करण्याची योजना आहे, पण शिवसेनेला इतिहासात जमा करणारे इतिहासात गाडले गेले हे लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का?

एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत त्यांचा मुलगा आहे असे सांगत मते मागितली होती, त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होते? अशी विचारणा त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. त्या विचाराने त्या पिढीतील लोक पुढे जातात. लोकांना स्वीकारायचे असेल तर स्वीकारतात नाहीतर स्वीकारत नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.