आमची मशाल ही गावागावात व प्रत्येकाच्या मनामनात पेटलेली आहे – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना भाजप व मिंधे गटाला फटकारले आहे. यावेळी त्यांनी भाजपकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांचा देखील खऱपूस समाचार घेतला. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचे मशाल हे नवीन पक्षचिन्ह लोकांच्या मनामनात पेटलेले आहे, असा विश्वास देखील व्यक्त केला.

पत्रकारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस – शरद चंद्र पवार पक्षांना मिळालेल्या नवीन चिन्हांबाबत विचारल्यावर संजय राऊत यांनी आमची मशाल ही गावागावत, लोकांच्या मनानात पेटलेली आहे, असे सांगिलते. ”हल्लीच्या डिजीटल युगात नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. आम्हाला मशाल चिन्ह मिळालं आहे. आमची मशाली ही गावागावात आणि लोकांच्या मनामनात पेटलेल्या आहेत. आता प्रश्न आहे ज्यांना घड्याळ मिळालं त्यांचं घड्याळ चालू आहे का आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंचा जागेवर आहे का तो त्यांना बघावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपकडून सतत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. या आरोपांचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, ”अमित शहांचे घराणेशाहीवरील वक्तव्य हास्यास्पद आहे. घराणेशाही ही भाजपमध्ये आहे. जय शहाने विराटपेक्षा जास्त सिक्सर मारलेयत का, जय शहाने सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त सेंच्युरी केल्यायत का जे त्यांना बीसीसीआयचे सेक्रेटरी केले आहे. अमित शहा गृहमंत्री नसते तर जय शहा सेक्रेटरी बनले असते का. घराणेशाहीला देखील एक प्रतिष्ठा असावी लागते. ती प्रतिष्ठा ठाकरे कुटुंबाची आहे. या कुटुंबाने महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वसाठी खूप मोठं योगदान आहे. या कुटुंबाचा फायदा भाजपलाही झाला आहे. ठाकरे कुटुंबाच्या घराणेशाहीचा फायदा मोदीजी व अमित शहांना झालाय. तसंच ज्यांना कुटुंब असते तेच घराणेशाहीवर बोलतात. आडवाणी सारख्यां आपल्या वडिलधाऱ्यांना जे सांभाळू शकत नाही ते काय परिवारवादावर बोलतायत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मंगळवारी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बराच काळ चर्चा झाली. आज पुन्हा एकदा आमची बैठक होणार आहे. आज अंतिम बैठक असेल. फार उशीर लावण्यात अर्थ नाही. अनेक राज्यातलं इंडिया आघाडीचं जागावाटप पूर्ण झालं आहे. आमच्या चारही पक्षात जागा वाटपा संदर्भात कोणताही संभ्रम नाही. उगाच ओरबडून घ्यायचं आणि जागांचा आकडा वाढवायचं आमचं धोरण नाही. आम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक जागा जिंकायची आहे. काँग्रेसची देखील तिच भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे. आपल्याला प्रत्येक जाागा जिंकून संविधानावर जो हल्ला होतोय तो परतवून लावयचा. आहे. हुकुमशाहीविरोधात लढायचं आहे. या देशातील्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची आहे. संविधानलाा जो धोका निर्माण झालाय त्यापासून संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.