शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर अकोल्यात प्राणघातक हल्ला, तिघांना अटक

>> राजेश देशमाने

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाळापूर मतदारसंघाचे निष्ठावंत आमदार नितीश देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख यांच्यावर अकोल्यात हल्ला झाला आहे. सराईत गुंडांनी पृथ्वी यांच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडला. यामुळे शहरात खळबळ उडाली.

पृथ्वी देशमुख हे कपड्याच्या दुकानाजवळ उभे असताना सराईत गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि पळ काढला. आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस स्थानकात दाखल झाले. हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे कळते.

दरम्यान, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी स्वत: आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तत्काळ पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, ‘आज माझ्या मुलावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याने तिथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.’