त्यांचे कोणतेही सैन्य येऊ द्या, मी अंगावर घेण्यासाठी सज्ज आहे, ही लढाई जिंकणारच! आदित्य ठाकरे यांचा निर्धार

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील राधानगरी येथे शिवसेना मेळाव्यात राज्यातील सद्यपरिस्थिती, घटनाबाह्य सरकार, राज्यासमोरील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मिंधे आणि भाजपवर प्रहार करत त्यांची सालटी काढली. राज्यातील प्रकल्पांची चोरी करून गुजरातची भरभराट करणाऱ्या सरकारला जनता त्रासली आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रच्या न्यायासाठी आपण लढायला तयार आहोत. जनतेने आपल्याला भक्कम साथ द्यावी. आपण हा लढा जिंकू आणि या लढ्यातून गद्दार वाचलेच तर अजून लढू, असा निर्धारही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

आम्ही उद्धवसाहेबांसोबतच आहोत आणि कायम त्यांच्यासोबतच राहू, असे जनता सांगत आहे. हाच आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र संपवण्याचे स्वप्न काहीजण बघत आहेत, मात्र, महाराष्ट्र कधीही संपत नाही. हा संपवणाऱ्यांनाच संपवतो. हा इतिहास आहे. आज राज्यातली परिस्थिती बिकट आहे. महाविकास आघाडीच्या काळात आपण प्रत्येकाला सोबत घेत राज्याचा विकास करत होतो. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा, उद्योग, कृषी सर्व क्षेत्राचा आपण विकास करत होतो. दोन वर्षांपूर्वी 50 खोके घऊन काहीजण ओके झाले. मात्र, महाराष्ट्र ओके झाला नाही. राज्यात सर्वच बिघडत जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

50 खोके घेत, खोटे बोलून सत्ता मिळवली, खोटे बोलत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले, त्यांच्यामागे भाजपची महाशक्ती होती. त्यामुळे राज्याचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. राज्याचा विकास करण्यासाठी त्यांनी गद्दारी केल्याचा दावा केला. मात्र, दोन वर्षात काही चांगले झाले आहे का, असा सवला त्यांनी केला. यावर जनतेने एका स्वरात नाही असे सांगितले. दोन वर्षात तरुणांसाठी रोजगार निर्माण झाला आहे काय, असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात जे रोजगार आणण्याचा प्रयत्न होता, ते प्रकल्प त्यांनी इतर राज्यात पळवले, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. काहीजण आपल्या खात्यातील योजना फक्त आपल्या मतदारसंघात आणतात. मात्र, आम्ही राज्याचा विकास केला. वेदांतामुळे सुमारे दोन लाखा तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र, खोके, धोके, खोटे यामुळे सरकार बदलले आणि हा प्रकल्प राज्याबाहेर गुजरातला गेला. गुजरातशी आपेल वैर नाही, प्रत्येक राज्य विकसित झाले तर देश विकसित होईल, असे आपले मत आहे. मात्र, आपच्या वाट्याचा प्रकल्प दुसरे राज्य दमदाटीने खेचून घेते, त्याचा राग येतो. असेच अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत वानखेडेवर होण्याची गरज होती, तो समनाही गुजरातमध्ये खेळवला गेला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालवला जात होता. त्याच संविधानानुसार जे गद्दार आहेत, ते बाद होणारच. मात्र, संविधानानुसार निर्णय होईल की नाही, अशी शंका आहे. मात्र, भाजपला हवा असलेल्या संविधानानुसार निकाल लागल्यास काय होईल, ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. विधानसभा राहुल नार्वेकर यांनी संविधानानुसार निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही. ही महाराष्ट्राची लढाई आहे. महानिष्ठा आणि महान्याय आपण म्हणतो आता महाराष्ट्राला न्याय हवा आहे.

घटनाबाह्य सरकार आले आहे. त्यांनी सत्ता काबीज केली. मात्र, जनतेला अच्छे दिन आलेले नाही. राज्यातले प्रत्येक क्षेत्र कोलमडले आहे. या सरकारमुळे सरकारी कर्मचारीही त्रस्त आहे. त्यांनाही न्याय हवा आहे. त्यांची पेन्शन योजनेची मागणी आहे. अनेक भ्रष्टाचारी भाजपत प्रवेश करत वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होतात आणि त्यांना मंत्रीपद मिळते. ज्यांची निष्ठा महाराष्ट्रासोबत आहेत. त्यांना काहीही मिळत नाही. मात्र, जो आमच्या हक्काचे आहे, ते चोरून गुजरातमध्ये नेत आहेत. महाराष्ट्रत फिरण्यासाठी टोल द्यावा लागतो. मात्र, बुलेट ट्रेनने जाण्यासाठी काहीही टोल नाही. दिघा स्थानकही रखडले आहे. अनेक प्रकल्प तयार असून त्याच्या उद्घाटनांसाठी वेळ नाही. मिंध्याना इतर राज्यासाठी वेळ आहे. मात्र, आपल्या राज्यासाठीच त्यांच्याकडे वेळ नाही.

महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. दुष्काळ, गारपिट, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शेतकऱ्यांना सरकारकडून काहीही मदत मिळाली नाही. हे फक्त आश्वासन देणारे सरकार आहे. फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र, काहीही अमंलबजावणी करण्यात येत नाही. कायदा- सुव्यवस्थेबाबत बोलायचे तर कोठे नेऊय ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती आहे. गणेशोत्सवात गोळीबार करणाऱ्या गद्दाराला सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद दिले आहे. हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

फोडाफोडी करून दोन पक्ष आणि एक घर फोडून त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर नाही. आपेल राजकारण म्हणजे समाजकारण असते. मात्र, त्यांचे राजाकारण म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय सुरू आहे. जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवले तसे दोन वर्षात त्यांना कोणते नवे कलम आणले आहे. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. आपण देशात महाराष्ट्र अग्रेसर होता. मात्र, दोन वर्षात त्यांनी राज्यातले सगळे धमकावून गुजरातमध्ये नेले जात आहेत. मात्र, येणारे काही महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. 2024 हे परिवर्तनाचे वर्ष आहे. केंद्रात कोणातेही सरकार येऊ दे, मात्र महाराष्ट्रातून जे खासदार जातील ,त्यांची निष्ठा महाराष्ट्राशी असली पाहिजे, असा माणूस निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही, तर त्यांचे मित्रांना अच्छे दिन येतील, मात्र, आपली परिस्थिती सुधारणार नाही.

अन्यायाविरोधात लढायला मी तयार आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही. ईव्हीएम, केंद्रीय यंत्रणा त्यांचे कोणतेही सैन्य येऊ द्या, मी अंगावर घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही फक्त एकजूट दाखवली तर कोणत्याही सैन्याशी आपण लढू शकतो. आपण कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही फक्त योग्य निर्णय घ्या. आपण महाराष्ट्रासाठी लढाई लढत आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त आपल्याला साथ द्या, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. ही लढाई आपण जिंकणारच आहोत. बचेंगे तो और भी लढेंगे, म्हणजे या लढाईत मिंधे, गद्दार वाचलेच तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही आणखी लढू, असा निर्धारही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.