पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. कांद्यावर लादलेली निर्यातबंदी आणि शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतकऱयांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, म्हणून पोलिसांकडून शेतकरी संघटनांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आजच्या या दौऱ्यात पंतप्रधान कांदा शेतकऱ्यांसाठी काहीतरी घोषणा करतील अशी आशा होती मात्र कांदा शेतकरी आणि नाशिककरांची त्यांनी घोर निराशा केली आहे.
दरम्यान कांदा शेतकऱ्यांची पंतप्रधानांनी भेटही घेतली नाही, त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ”मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं. नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
”राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.