लवकरच आमचं सरकार येईल, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची लूट थांबेल – आदित्य ठाकरे

महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120  एकरवरील जागेत मुंबई महानगर पालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बांधण्यात येणार आहे. सोमवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून हे प्रश्न उपस्थित केले. तसेच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र बिल्डर मित्र, वेलिंग्टन क्लब, सीसीआय आणखी मोकळ्या जागांना लक्ष्य करतील मात्र लवकरच आमचं सरकार येईल, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची लूट थांबेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

” भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपल्यासंदर्भात अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 1. रेसकोर्सच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्या झोपड्या/घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही. माझ्या माहितीनुसार, हे मिंधे सरकार आपल्या लाडक्या बिल्डरकरवी रेसकोर्सवर ‘झोपू’ योजना राबवेल. 2. ⁠खासगी तबेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईकरांचे 100 कोटी का घालवायचे? या घोड्यांचे मालक आणि द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड त्यासाठी लागणारी किंमत मोजायला समर्थ आहेत. 3. ⁠आम्ही आधीच कोस्टल रोड येथे भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था केली असताना आता रेसकोर्स येथे भूमिगत कार पार्किंग उभारण्याची गरजच काय? हे केवळ मुख्यमंत्र्यांच्या (कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या) ठेकेदार मित्राला काम देण्यासाठी केले जात आहे. परिणामी : चार वर्षे खोदकाम सुरू राहील. रेसकोर्स बंद राहील आणि मुंबईचे वायू प्रदूषण वाढत राहील. 4. सर्वात हास्यास्पद म्हणजे हे भाजप पुरस्कृत सरकार आम्ही कोस्टल रोड प्रकल्पासाठी राखून ठेवलेला 96 हेक्टरचा हरित पट्टाही याला जोडून असल्याचे दाखवत आहे. नशीब त्यांनी ‘अरबी समुद्र’ त्यांच्या ‘थीम पार्क’चा भाग म्हणून दाखवला नाही. महालक्ष्मी रेसकोर्सनंतर बेकायदा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र, वेलिंग्टन क्लब, सीसीआय आणखी मोकळ्या जागांना लक्ष्य करेल. पण आमचे सरकार लवकरच सत्तेत येईल आणि ही लूट थांबवेल, याची मला खात्री आहे”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.