पियूष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा छळ, आदित्य ठाकरेंची कडाडून टीका

उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवारी पियूष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल याच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. परिक्षेच्या आदल्या दिवशी कॉलेजकडून विद्यार्थ्यांची ओळखपत्रे काढून घेण्यात आली होती व विद्यार्थ्यांना भाजप पुरस्कृत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली. दुसऱ्या दिवशी परिक्षा असताना नाईलाजाने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले. मात्र या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने त्याची नाराजी बोलून दाखवली. त्या विद्यार्थ्याने ध्रुव गोयल यांना विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून त्यावरून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून भाजपच्या हुकुमशाहीवर कडाडून टीका केली आहे. ”या सत्ताधाऱ्यांना आता आपल्या देशात लोकशाही नांदूच द्यायची नाहीए. सध्या घडत असलेल्या काही घटनाच त्याची साक्ष देत आहेत. इथे या व्हिडीओ या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षेच्या एक दिवस आधी भाजपच्या उत्तर मुंबईच्या उमेदवाराच्या मुलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

पुढे यावरून टीका करताना ठाकरे यांनी भाजपला व कॉलेज प्रशासनाला फैलावर घेतले. ”असंही या सरकारमध्ये हे विद्यार्थी पास जरी झाले तरी त्यांना नोकऱ्या कुठे आहेत. त्यामुळे त्यांना भाजप नेत्याच्या मुलाने आयोजित केलेल्या लेक्चरला उपस्थित राहायला लावले जात आहे. या भयंकर प्रकारासाठी कॉलेजच्या मुख्यध्यापकांना निलंबीत नको का करायला? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेनेने देखील या घटनेचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ”देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल? असा सवाल शिवेसनेने केला आहे.