पुष्पवृष्टी, ढोलताशांचा गजर आणि अपूर्व जल्लोष!

शिवसेनेची धगधगती मशाल आज तब्बल तीन दशकानंतरही तशीच धगधगती आहे, याची खात्री तमाम नाशिककरांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करताना अवघा नाशिक जिल्हा भगवामय झाला. ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी,  ढोल ताशांचा गजर, शिवसेनेचा जयघोष कार्यकर्त्यांत जणू नवा उत्साहच भरत होता. या अभूतपूर्व वातावरणात हजारोंच्या जनसमुदायांने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत पक्षप्रमुखांना उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी ग्वाहीच दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे सोमवारी दुपारी ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तेथून ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक येथे रवाना झाले. आडगाव, जेलरोड, देवळाली गाव, संसरी नाका ते भगूरपर्यंत दुतर्फा हजारो शिवसैनिक, नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

आम्ही कायम तुमच्यासोबत

ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला यांची दुतर्फा मोठी गर्दी होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताना ‘आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत’ असा विश्वास व्यक्त केला.

पुष्पहार घालून जंगी स्वागत

ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. देवळाली गाव आणि संसरी नाका येथे जेसीबीच्या मदतीने भव्य पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भगूरमध्ये सुवासिनींनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले. तेथून नाशिककडे येत असताना वडनेर गेट, पाथर्डी गाव सर्कल येथेही हजारो शिवसैनिक, नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, मोठय़ा उत्साहात त्यांचे स्वागत केले. जय भवानी-जय शिवाजी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आवाज कुणाचा शिवसेनेचा या घोषणांनी परिसर दणाणला होता.