शिवसेनेच्या ‘जनाधिकार’ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, अनेक प्रकरणे जागीच निकाली

मिंधे सरकारकडून शासन आपल्या दारी या उपक्रमावर कोटय़वधींची उधळपट्टी होते, मात्र जनतेचे प्रश्न आणि समस्या सुटत नाहीत. केवळ घोषणाबाजी केली जाते. त्यामुळे शिवसेनेने जनाधिकार हा जनता दरबार आजपासून सुरू केला. पहिल्याच दिवशी या जनता दरबाराला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी आपली गाऱहाणी या वेळी मांडली आणि त्यातील अनेक प्रकरणे जागीच निकाली काढण्यात आली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा जनाधिकार जनता दरबार सुरू केला. आज सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय असलेल्या शिवालयमधून त्याचा शुभारंभ झाला. चांद्यापासून बांद्यापर्यंत विविध वर्गातील जनतेने या वेळी आपले प्रश्न आणि समस्या दानवे यांच्यासमोर मांडल्या.

सुमारे 150 प्रकरणे या वेळी मांडली गेली. त्यातील 60 नागरिकांचे प्रश्न तिथल्या तिथे निकाली काढले गेले. ज्यांची प्रकरणे निकाली निघाली त्यांना विरोधी पक्षनेते कार्यालयातून तसे पत्रही देण्यात आले. मुंबईतील अनेक नगसेवकांनी त्यांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारीही दानवे यांच्यासमोर मांडल्या. त्याचप्रमाणे मुंबईतील म्हाडा, एसआरए तसेच विविध नागरी समस्याही नागरिकांनी मांडल्या.

बंद केलेले शिवभोजन केंद्र क्षणात सुरू

पुणे येथे वारकरी सेनेसाठी असलेले शिवभोजन केंद्र काही किरकोळ कारणास्तव बंद करण्यात आले होते. त्याबाबत जनता दरबारात धोंडू महाराज पानसरे यांनी गाऱहाणे मांडताच अंबादास दानवे यांनी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

– विराज परदेशी या खेळाडूने राज्य क्रीडा पुरस्काराचा विषय गेले वर्षभर प्रलंबित असल्याचे सांगितले. त्यावर क्रीडा मंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.