सरकार आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक गुरुवारी रात्री उशिरा अचानक स्थगित करण्यात आली यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. युवासेना या निवडणुकीत पुन्हा बाजी मारणार याची जाणीव झाल्यामुळेच सरकारने निवडणूक स्थगित केली असून मिंधे सरकार डरपोक आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. शासन आपल्या दारी, निवडणुका घ्यायला घाबरी… अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. मतदारांची नोंदणी व अन्य प्रक्रिया पूर्ण झाली होती, परंतु गुरुवारी रात्री अचानकपणे मुंबई विद्यापीठाने एक पत्रक काढले. पुढील आदेश मिळेपर्यंत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्याचे संतप्त पडसाद आज विद्यार्थी संघटना आणि पदवीधर मतदारांमध्ये उमटले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाच्या या निर्णयावर ताशेरे ओढले.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर असे नक्की काय घडले की, निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली, असा सवाल या वेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, बंगालमध्ये निवडणुकी वेळी हिंसाचार नको म्हणून पेंद्राने सर्व सुरक्षा यंत्रणा तिथे पाठवल्या होत्या. मणिपूरमध्ये वातावरण पेटले आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. तरीसुद्धा निवडणूक स्थगित केली गेली.

2010मध्ये युवासेनेने निवडणूक लढवली तेव्हा दहापैकी आठ उमेदवार निवडून आले होते. 2017मध्ये दहापैकी दहा जागा युवासेनेने जिंकल्या. सगळेच पक्ष आमच्या समोर निवडणूक लढले होते तरीही युवासेनेला चांगले मताधिक्य मिळाले होते. आताही साधारणपणे सवा लाख मतदारांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरून या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती आणि छाननीनंतर सुमारे 95 हजार मतदार होते. आमच्या दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मग निवडणूक स्थगित करण्याइतके झाले तरी काय? काही गडबड तर झाली नाही ना? अशी विचारणाही आदित्य ठाकरे यांनी केली. सुशिक्षित मतदारांची चूक काय? त्यांचा आवाज सिनेटमध्ये जाऊ नये का? असेही ते म्हणाले.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव तर नाही ना?

ही बैठक कुठे झाली, किती वाजता, कोणाच्या घरी, बैठकीला कोण कोण होते, काही मिनट्स आहेत का, बैठकीला राज्यपाल उपस्थित होते का, की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दवाबामुळे विद्यापीठाने स्थगितीचा निर्णय घेतला, असे एकापाठोपाठ एक सवाल करतानाच मिंधे सरकार पळपुटे आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. निवडणुकीला स्थगिती दिली, मग ती होणार कधी याबाबतही स्पष्ट करायला हवे, असे ते म्हणाले.

तुमचे सरकार सिनेट नाही, आम्ही पाडणार

सिनेट निवडणुकीला घाबरता कशाला? तुमचे सरकार सिनेट नाही, तुमचे सरकार आम्ही पाडणार आहोत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिला. गेल्या वर्षी पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजप आणि मिंधे गटाचा पराभव झाला म्हणून ते सिनेट निवडणुकीला घाबरत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेते कुलगुरूंना जाब विचारणार

स्थगितीच्या मुद्दय़ावरून आपण न्यायालयात किंवा कुलगुरूंकडे जाणार नसून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते कुलगुरूंची भेट घेऊन जाब विचारतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकाही स्थगित होतील

2024च्या लोकसभा निवडणुकाही स्थगित केल्या जातील अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. सरकारला कोणत्याही निवडणुका घ्यायचा नाहीत, तर फक्त नेमणुका करून जिंकायचेय, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

– लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. आता सिनेट निवडणुकीलाही स्थगिती दिली. इतकी फोडाफोडी करून, दोन-दोन उपमुख्यमंत्री असून, महाशक्तीसोबत असूनही जर निवडणुका घेत नसतील तर या सरकारचा उपयोग काय?

घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरताहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. घाबरत होते म्हणूनच त्यांनी भाजपात उडी मारली, असे ते म्हणाले.