गिरणी कामगारांच्या लढ्याला शिवसेनेची साथ

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) ताब्यातील 11 गिरणी वसाहतीतील चाळींचा पुनर्विकास लवकरात लवकर करावा आणि रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी बीडीडी चाळींच्या धर्तीवर 500 चौरस फुटाची घरे उपलब्ध करून देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगारांनी पुकारलेल्या लढ्याला शिवसेनेने साथ दिली तसेच गिरणी कामगारांचे प्रश्न केंद्रात मांडू, असे आश्वासन देण्यात आले.

गिरणी कामगार राहत असलेल्या शंभर वर्षे जुन्या या इमारती सध्या जीर्णावस्थेत आहेत. कधीही त्या कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई विभागातील एनटीसीच्या ताब्यातील 11 गिरणी वसाहतीतील चाळींचा पुनर्विकास त्वरित करण्यात यावा या मागणीसाठी दादर पूर्व नायगाव येथील कोहिनूर मिल्स चाळ कंपाऊंड येथे गिरणी चाळ संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष जनार्दन देशमुख, सचिव राघोबा बाईत आणि सदस्य दामोदर पांडकर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, विभाग संघटक श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.