महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, गुंडांनी राज्याचा ताबा घेतलाय; संजय राऊत कडाडले

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, कोसळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ म्हणजे एकप्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवले जात आहे. मी आजही मुख्यमंत्र्यांच्या गँगमधील एका गुंडाचा फोटो ट्विट केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत रसातळाला गेली आहे. अमित शहा नवीन कायदे लावू इच्छितात, पण आधी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष्य घाला असे देशाच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणे कठीण झाले आहे. गुंडांनी राज्याचा ताबा घेतला आहे. त्याच्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी आहे. राष्ट्रपती राजवट लावावी, विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्याव्यात. अन्यथा इथे गुंड हैदोस घालतील.

सरकारच्या गुंडगिरीविरोधात काय पावलं उचलावीत याबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. कालच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीतही या संदर्भात चर्चा झाली. आम्ही नक्कीच पावलं उचलू आणि सरकारच्या गुंडशाही, झुंजशाहीला जनतेचे आव्हान देऊ, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचे काय झाले? असा सवाल करत राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचे समर्थन करताहेत. चार दिवसांपूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी काही गुंडांची परेड केली. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो, व्हिडीओ काढणे बंद असा दम भरला. मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा, त्यांनाही हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.