मोदी-फडणवीस सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला वाळवी लागली, संजय राऊत यांचा घणाघात

बारामती येथे शनिवारी होणाऱ्या ‘नमो महारोजगार मेळावा’ कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नाही किंबहुना त्यांना निमंत्रणदेखील शासनाकडून देण्यात आले नाही. यावरून राजकारण तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

शुक्रवारी माध्यम प्रतिनिधींनी याबाबत सवाल उपस्थित केला असता खासदार संजय राऊत म्हणाले की, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. एखाद्या भागाचा आमदार किंवा खासदार आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला शासकीय कार्यक्रमाला बोलवायचे नाही अशा प्रकारचे राजकारण राज्यात कधीच झाले नव्हते. ‘नमो महारोजगार मेळावा’ शिंदे-भाजप गँगची नाही तर सरकारी योजना आहे. विद्यमान खासदार आणि आमदार त्या योजनेचा भाग असतात. शासन त्या भागात जाऊनही त्यांना बोलावत नाहीय. हे अशा प्रकारचे घाणेरडे, डर्टी फॉलिटिक्स देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सत्तेत आल्यापासून सुरू झाले.

आपल्याच आमदारांना निधी द्यायचा. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही. आमदाराशी राजकीय वाद असेल, पण ज्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का? तो मतदारसंघ महाराष्ट्रात नाही का? हा कोणता खेळ चालला आहे? वर्षा, सागर, देवगिरी बंगल्यावरील झाडांना पैसे लागलेत का? की साताऱ्याच्या दरेवाडीत जमिनीतून खोके उगवताहेत की झाडाला खोके लागताहेत? असा सवाल राऊत यांनी करत सरकारला झापले. मर्जीप्रमाणे निधी वाटप करायचा, कुठेही कार्यक्रम घ्यायचा आणि स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रित करायचे नाही. हा कोणता खेळ चालला आहे? केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस हे दोन वीर सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला वाळवी लागल्याची टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अनेक बातम्या येत आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, हे आकडे कुठून येतात माहिती नाहीत. पण जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांची एक बैठक होईल. जे आकडे आहेत ते एकत्र बसून जाहीर करू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.