आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे! – संजय राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीने एक व्हिडीओ शेअर करत मनाप्रमाणे चर्चा झाली नसल्याचे म्हटले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे असे म्हटले.

हे वाचा – ‘केसाने गळा कापू नका, अन्यथा…’, मिंधे गटाचा भाजपला इशारा, जागावाटपावरून ठिणगी

माध्यम प्रतिनिधींनी महाविकास आघाडीच्या चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीत असतानाही नेहमी मनासारखे होत नव्हते. आताही आम्ही महाविकास आघाडीत आहोत. प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेही असा हट्ट सोडला आहे. शिवसेनेनेही आपल्या अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडल्या आहेत किंवा सोडत आहेत. कारण महाराष्ट्रात आम्हाला वेगळे चित्र निर्माण करायचे आहे, असेही राऊत म्हणाले.

अजित पवार पडले तोंडघशी, ज्या राज्यात NCP निवडणूकही लढली नाही तिथले आमदार भेटल्याचा दावा

ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी अत्यंत उत्तम चर्चा झाली. काही जागांबाबत पुढे चर्चा होईल, त्यामुळे काही घडले नाही असे सांगणे बरोबर नाही. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचे पूर्ण समाधान करायचे ठरवले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपला मदत होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांना देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारे मोदींचे राज्य नको आहे. त्यांना संविधानाचे रक्षण करायचे आहे आणि आमचीही तीच भूमिका असल्याने आम्ही एकत्र आहोत, असे राऊत म्हणाले.

“तातडीने निर्णय घ्यावा व असंख्य कुटुंबास…”, खासदार संजय राऊत यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र