मर्जीतल्या उद्योगपतींना ठेके द्या आणि शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्या; हा भाजपचा गोरखधंदा! – संजय राऊत

गौतम अदानी आणि भारतीय जनता पक्ष वेगळा नाही. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डबाबत फटकारले असून ज्यांनी हे बॉण्ड विकत घेऊन भाजपची तिजोरी भरली त्यांची नावं जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यात सगळ्यात वरचे नाव अदानींचे असणार अशी खात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एमएसआरटीसीने वांद्रेतील 29 एकर जागेवरील रिक्लेमेशन प्रोजेक्ट अदानींना दिल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. अशा प्रकारचे ठेके मर्जीतल्या उद्योगपतींना देऊन त्या बदल्यात निवडणूक निधी म्हणून शेकडो कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचे हा भाजपचा गोरखधंदा आहे. म्हणूनच त्यांच्या तिजोरीत हजारो कोटी जमा आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्डबाबत दिलेला निकाल भाजपचा मुखवटा फाडणारा असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.

मुंबईतील मिठागाराची जागा अदानींना, धारावी पूनर्विकास प्रकल्प अदानींना आणि आता वांद्रे रेक्लमेशनचा भूखंडही अदानींना. अख्खी मुंबई अदानींना. मुंबईचे नाव बदलून अदानीनगर केले तर मुंबईसाठी हुतात्मे झालेल्या 106 जणांना स्वर्गात पुन्हा हौतात्म्य पत्करावे लागेल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, अख्खी मुंबई उद्योगपतीच्या घशात चाललीय, मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसलेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठवल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, इलेक्टोरल बॉण्डचा भ्रष्टाचार समोर आला आहे. काळा पैसा, मनी लॉण्डरिंगचा पैसा भाजपच्या खात्यात पैसा गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मग काँग्रेसची खाती का गोठवली जात आहेत? भाजपची खाती गोठवली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या निर्णयाचा लोकसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसणार नाही. आमच्याकडे पैसा नसला तरी लोकांचे समर्थन असल्याचेही राऊत म्हणाले.

चिपळूणमध्ये घडलेल्या प्रकारावर बोलताना राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. भाजपने चिखलफेक करण्यासाठी काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या थोर राजकीय संस्कृती, परंपरेवर नशेच्या, दारुच्या, अनैतिकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपच्या भाडोत्री गुंडांकडून सुरू आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला जाताना दिसत असून याला देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सध्याचा भारतीत जनता पक्ष जबाबदार असल्याशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे रोज 500 कोटींचे नुकसान होत असल्याची टीका करणाऱ्या मोदी सरकारचा राऊत यांनी समाचार घेतला. मोदी सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहे. शेतकऱ्यांच्या अटकेसाठी तुरुंग उभारू शकता, रस्त्यावर बंदुका रोखलेले पोलीस थांबवू शकता, अडथळे निर्माण करण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकू शकता, पण रोज 500 कोटींचे नुकसान होतंय म्हणणारे सरकार हा विषय गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही. या आंदोलनाचा आज 16वा दिवस असून पंतप्रधान मोदी काय करत आहेत? ते परदेशात घंटा वाजत फिरताहेत. दोन वर्षांपूर्वी झालेले शेतकरी आंदोलनही असेच बदनाम करण्यात आले. तेव्हा भाजपने हे शेतकरी नसून खलिस्तानी आहेत. त्यांना खलिस्तान्यांकडून रसद मिळतेय. ते शेतकरी नसून नक्षलवादी, माओवादी असल्याचे म्हटले होते. आताही तोच प्रयत्न केला जात आहे, असेही राऊत म्हणाले.