एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्यावर हसन मुश्रीफ तर खांद्यावर प्रफुल्ल पटेल; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाच जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा विरोधी पक्षांना नोटिसा, त्यांची चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी 12 तास ईडी चौकशी झाली. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रविंद्र वायकर आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

500 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग करणारे भाजप आमदार राहुल कुल, 189 कोटींचा घोटाळा करणारे दादा भुसे, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि सहकारी बँक घोटाळा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईडी नोटीस पाठवणार नाही. हसन मुश्रीफ यांना आलेल्या नोटिसा जाळून टाकल्या जातील. प्रफुल्ल पटेल, हिमंत बिस्वा सरमा यांनाही नोटीस पाठवली जाणार नाही. पण महाराष्ट्रात किंवा देशात हुकुमशाहीविरोधात लढणाऱ्या विरोधकांना नोटीस काढण्याचे तंत्र सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

रोहित पवारांची ईडी चौकशी झाली. किशोरी पेडणेकर यांना आज चौकशीला बोलावले आहे. रविंद्र वायकर यांनाही नोटीस पाठवली आहे. ही सगळी भाजपच्या हुकुमशाहीविरोधात लढणारी लोकं आहेत. दोन-पाच लाखांच्या व्यवहारासाठी नोटीस पाठवल्या जात असून जे हजारो कोटींचे घोटाळे करून, देश बुडवून पळून गेले त्यांच्यावर कोणाचे लक्ष नाही. संदीप राऊत यांना नोटीस आल्याचे मला माहिती असून यामागील कारण हास्यास्पद आहे. पण आमच्या घरातील लोकं ठामपणे उभे राहतील. आम्ही गुडघे टेकणार नाहीत, असा घणाघात राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात मोगलाई चालू आहे की मोदींचे राज्य औरंगजेबाचे आहे? महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे की अफझलखान, शाहिस्तेखानाचे राज्य आहे की निजामशाही आली आहे? दोन-पाच लाखांच्या व्यवहारासाठी नोटीस पाठवत आहेत. तुम्ही काय चिंचोका खातात का? तुमच्या बायका-पोरं परदेशात दोन-चार महिने व्हिला घेऊन राहतात. त्यासाठी पैसे कुठून आले? याचे प्रायोजक कोण आहेत? आम्ही सांगू शकतो. पण आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे संस्कार आहेत. तुमची लढाई आमच्याशी आहे, मग हिम्मत असेल तर आमच्याशी लढा.

हे नामर्द लोकं आहेत. पण आमच्या रक्तात शिवसेना आहे. जे डरपोक लोकं होते ते तुमच्या कळपात शिरले आहेत. पण आम्ही जाणार नाही. महाराष्ट्रात 8 हजार कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा समोर आला आहे. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले, पण तुम्ही एफआयआर रद्द केली. याच क्राऊड फंडिंगच्या नावाखाली टीएमसीचे खासदार साकेत गोखले यांना अटक झाली, पण किरीट सोमय्या यांचा गुन्हा तुम्ही रद्द केला आणि आम्हाला नोटीस पाठवता. तुमच्या नोटिसीला आम्ही घाबरत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. यावरही राऊत यांनी भाष्य केले. मोदींनी त्यांचा घोटाळा काढला आणि त्यांना थेट सरकारच्या तुरुंगात टाकले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन मांडीवर घेतले. एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्यावर हसन मुश्रीफ आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेल यांना बसवले आहे. रामाची पूजा करता सांगतात, पण रामच तुमचा वध करणार आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार

मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली आहे. हा घोटाळा असून मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. शिवसेनेच्या राजवटीत मुंबईची महानगरपालिका वैभवशाली, श्रीमंत झाली. लोकांच्या पैशांना संरक्षण होते. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि प्रशासकाचा कारभार यामुळे मुंबईच्या, मराठी माणसाच्या तिजोरीवर डाका टाकण्यात येत आहे. हा सरळसरळ गैरव्यवहार असून लूट आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.