भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा, जो त्यांच्यासोबत जाईल तो पवित्र होईल; संजय राऊत यांचा घणाघात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर भाष्य केले आणि भाजपवर निशाणा साधला.

छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, याबाबत ईडी, आयटीला विचारा. भाजपनेच त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांना तुरुंगातही टाकले होते. आता त्यांची फाईल सापडत नाही. भुजबळ कोणत्या पक्षात जातील माहिती नाही. पण अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी यांच्याप्रमाणे भुजबळही भाजपचा चेहरा नक्कीच बनू शकतात. कारण भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा आहे आणि जो भ्रष्टाचारी भाजपसोबत जाईल तो पवित्र होईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, हेमंत सोरेन यांची अटक आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे. या देशात ईडी जी कारवाई करते ती 99 टक्के बेकायदेशीर आहे. परंतु ईडी ही भाजपची विस्तारित शाखा असून भाजप सांगेल तेच करते. ईडी आणि ईव्हीएमशिवाय भाजपचे अस्तित्व नाही. ‘ईडी आणि ईव्हीएम है, तो मोदी है’, असा नारा देशभरात घुमतोय. महाराष्ट्र असो किंवा झारखंड, दिल्ली असो किंवा बिहार, जे भाजपसोबत नाहीत त्यांच्यावर ईडी कारवाई करते, असा आरोपही राऊत यांनी केला.

छगन भुजबळ पुन्हा पक्ष बदलणार? अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी नव्या सरकारचा अद्याप शपथविधी झालेला नाही. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. आपल्याकडे लोकं झोपेत असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतात. अजित पवार दुपारी देवगिरीतून निघतात आणि पाच मिनिटात शपथविधी होतो. पण झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडे पूर्ण बहुत आहे. परंतु सरकार आणि मुख्यमंत्री वेटिंगवर आहेत. ही लोकशाही आहे देशात, असा टोला राऊत यांनी लगावला.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अधिकृतपणे समावेश केलेला आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आज आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. प्रकाश आंबेडकर स्वत: चर्चेत सहभागी होत आहे आणि महाराष्ट्रातून भाजपची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी शर्थ करताहेत. त्यांची मदत, कुमक आमच्या लढाईत फार महत्त्वाची आहे, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)