दिल्लीसमोर झुकणाऱ्याला सत्तेत बसू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

दिल्लीसमोर झुकणाऱ्या सत्तेत बसू देणार नाही. देशात सगळीकडे अस्थिरता आहे. प्रत्येक राज्यात, प्रामुख्याने जिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तिथे अस्थिरता आहे. मला स्थिर, चांगले सरकार महाराष्ट्राला द्यायचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील वातावरण शिवसेना, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. महाराष्ट्राच्या हिताचे कोण बोलतंय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे आणि लोक आशिर्वाद द्यायला येतात. सामान्य नागरिक आणि प्रामाणिक लोकं आमच्यासोबत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले.

शेतकरी आंदोलन हा महत्त्वाचा विषय आहे. देशाच्या सीमेप्रमाणे दिल्लीच्या सीमेवर अन्नदात्याच्या विरोधात खिळे लावले आहेत. वित्तमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना महिला, शेतकरी, गरीब आणि तरुणांवर पुढच्या वर्षी लक्ष देणार असल्याचे म्हणाल्या. याचाच अर्थ प्रत्येक वर्ग नाराज आहे. मग गेल्या 10 वर्षात यांनी काय केले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, गेल्यावेळी आंदोलन उठवण्यात आले तेव्हा जी आश्वासने दिली होती पूर्ण झाली नाहीत. सरकारने एम.एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिले, पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे. ड्रोनमधून अश्रुधूर सोडला जात आहे. हे नक्की कोणाचे राज्य समजायचे? आपण कृषीप्रधान देश बोलतो, पण आज शेतकऱ्यांवरच हल्ला केला जात आहे. लाठीचार्ज, गोळीबार केला जात आहे. दिल्ली सील करण्याऐवजी ‘दिल खोलो और बात करो’, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.