शिंदे गँगमध्ये आणखी एक दाखलेबाज महात्मा; संजय राऊत यांनी शेअर केला फोटो

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे गँगमध्ये सामील झालेल्या आणखी एका नव्या गुंडाचा फोटो शेअर केला. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिंदे गँगमध्ये एकापाठोपाठ नामचीन गुंड सहभागी होत आहेत. खुद्द एकनाथ शिंदे त्यांचे भगवा देऊन स्वागत करत आहेत. नीलेश घायवाळ, जितेंद्र जंगम या कुख्यात गुंडांच्या प्रवेशाचे फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आज त्यात आणखी एका फोटोची भर पडली. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा…असे त्या फोटोबाबत संजय राऊत यांनी नमूद केले आहे. ‘ठाणे व पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे…अशा गुह्यांत सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! गुंडांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!’ असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

पक्षांतरासाठी वायकरांवर ईडीकडून दबाव

शिवसेना नेते, आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडीवगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव टाकला जात आहे. शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा, असे धमकावले जात आहे. हा एकप्रकारचा दहशतवाद आहे. असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते, असे ट्विट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, असेही संजय राऊत यांनी ठणकावले आहे.