मंत्रालयातील गुंडांची टोळी महाराष्ट्राला बदनाम करतेय; आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर घणाघात

गँग लीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा?

मिंधे बदनाम आहेतच, मात्र त्यांच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, मंत्रालयातील गुंडांची टोळी महाराष्ट्राला बदनाम करतेय, जर गँग लीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यात नवीन उद्योग आणायला उद्योजक तयार नाहीत. त्यामुळे मोठय़ा हिमतीने गुंडांचे राज्य उलथवून लावण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. कल्याणमधील कोळसेवाडी शाखेला भेट दिल्यानंतर शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

कल्याणच्या दुर्गाडी चौकात सायंकाळी प्रचंड जल्लोषात शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. येथून मोठय़ा जल्लोषात रॅलीने शिवसैनिकांचा ताफा कोळसेवाडी शाखेकडे आला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून खोके सरकारला तडाखे दिले.

भाजपने धोका देऊन राज्यात खोके सरकार आणले. आता त्यांच्याच आमदाराला पोलीस ठाण्यात गोळीबार करावा लागतो. गोळीबाराचे समर्थन करताना या आमदाराने घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. मिंधेंमुळे भाजपच्या मूळ विचारधारेची गळचेपी होत आहे. त्यामुळे भाजपच्या सच्चा कार्यकर्त्यांना तरी मिंधेंचा कारभार पसंत आहे का, असा सवालही त्यांनी केला. मिंधे मुळातच बदनाम आहेत, मात्र यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. आपल्याला हे परवडणारे नाही. त्यामुळे गुंडांचे राज्य उलथवून त्यांना पळवून लावण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, संविधान वाचवण्यासाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या लढय़ाला साथ द्यावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते अल्ताफ शेख, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, सह संपर्कप्रमुख रमेश जाधव, लोकसभा समन्वयक धनंजय बोडारे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, सदानंद थरवळ, बाळ हरदास, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, अशोक म्हात्रे, तात्या माने, शहरप्रमुख शरद पाटील, विवेक खामकर, प्रकाश तेलगोटे, जगदीश लोहळकर, युवासेना शहर अधिकारी निरज कुमार, महिला संघटक विजया पोटे, राधिका गुप्ते, मीना माळवे आदी उपस्थित होते.

गद्दार कोल्डकॉफी खासदाराला चॅलेंज देतोय…

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला. कल्याण-डोंबिवलीतील जनता यापुढे गद्दारांना थारा देणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे इथले नेसकॉफीवाले गद्दार खासदार पुन्हा लढणार नाहीत. मात्र मी चॅलेंज देतो की त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस दाखवावे. इथून जिंकणार तो आपला शिवसैनिकच, असा जबरदस्त विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुंडांची परेड कसली घेताय त्यांना जेलमध्ये टाका

गुंडगिरीमुळे जनता भीतीच्या छायेखाली आहे. सतेच्या जोरावर सुरू असलेली दडपशाही मोडून काढण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. कायदा व सुव्यवस्था राखायची असेल गुंडांची परेड न घेता त्यांना जेलमध्ये टाकायची हिंमत पोलीस दाखवणार का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

चिन्ह मशाल.. विजय विशाल

ज्या मिनिटाला निवडणूक लागेल त्या क्षणाला सर्वांनी गल्ली ते दिल्ली महाराष्ट्र हिताचे उमेदवार निवडणूक देण्याचा निश्चय केला पाहिजे. चिन्ह मशाल आणि विजय विशाल हा मंत्र सर्वांनी जपावा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.