ईव्हीएम हटवा… लोकशाही वाचवा! शिवसेनेकडून ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे अरबी समुद्रात विसर्जन

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा करून महायुती चोरीच्या मार्गाने सत्तेवर आली. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून ईव्हीएमविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज मुंबईत शिवसैनिकांनी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे अरबी समुद्रात विसर्जन करून निषेध नोंदवला.

ईव्हीएमच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधक सध्या आमनेसामने आहेत. महाविकास आघाडीने ईव्हीएमविरुद्ध रान उठवले आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मुंबईत आज शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. ईव्हीएम विसर्जित केले नाही तर लोकशाही विसर्जित होईल, प्रगत देशांमध्ये निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जात नाही मग हिंदुस्थानात का, असा सवाल करत शिवसैनिकांनी यावेळी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती अरबी समुद्रामध्ये विसर्जित केली. ‘ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शिवसैनिक शैलेश कुंदर, सुरेंद्र यादव आणि संतोष राणे उपस्थित होते.