शिवडीत झोपडय़ांचे सर्वेक्षण करूनही ओळखपत्रे नाहीत; कंपनीला काळय़ा यादीत टाकण्याची शिवसेनेची मागणी

शिवडी-कॉटनग्रीनमधील प्रभाग क्रमांक 206 मधील पूर्व आणि पश्चिम भागातील काही वस्त्यांचे एसआरएअंतर्गत खासगी कंपनीमार्फत सर्वेक्षण करून ओळखपत्र देण्यात येणार होते. मात्र सर्वेक्षण करूनही कंपनीने रहिवाशांना अद्याप ओळखपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे कंपनीला ओळखपत्रे देण्यास भाग पाडून कंपनीला काळय़ा यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेनेने एसआरएकडे केली आहे.

शिवडी-कॉटनग्रीनमध्ये जयभीम नगर, अमन शांतीनगर, पारधीवाडा, इंदिरानगर पह्सबेरी रोड, हाजीबंदर रोड, गिरीनगर, गाडीअड्डा, राजीव गांधीनगर, रामगड, आझादनगर, क्रांतिनगर आणि हिरजी जीवराज वाडी या वस्त्यांमधील घरांची स्थावर मालमत्ता जाणून घेण्यासाठी खासगी कंपनीकडून घराची कागदपत्रे घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जात आहे. नव्याने केले जात असलेले सर्वेक्षण थांबवा आणि पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे झोपडपट्टीवासीयांना ओळखपत्रे कंपनीला द्यायला भाग पाडा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी एसआरच्या सीईओकडे केली आहे.