शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर टाटा कॅपिटल ताळय़ावर!

कर्जाच्या नावाखाली ग्राहकाला लुबाडणाऱया टाटा कॅपिटल कंपनीला शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने चांगलाच दणका दिला. ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर प्रशासन ताळय़ावर आले असून न्याय मिळाल्याबद्दल या ग्राहकाने शिवसेनेचे आभार मानले आहेत.

टाटा कॅपिटलकडून मुकेश ठाकूर यांनी एक लाख 32 हजार रुपयांचे पर्सनल लोन घेतले होते, सहा महिन्यांत लोन क्लोज करावे म्हणून त्यांनी टाटा कॅपिटलच्या हेड ऑफिसला जाऊन विचारणा केली असता तेथील अधिकाऱयांनी 4 लाख 32 हजार रुपये अधिकचे कर्ज आपल्या नावावर असल्याचे व व्याजासह एकूण 6 लाख 23 हजार 317 रुपये लोनचे रिपेमेंट करावे लागेल असे ठाकूर यांना सांगितले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी त्यांनी त्यांनी टाटा कॅपिटलच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवन येथील ग्राहक संरक्षण कक्षाकडे धाव घेतली.  तक्रारीचे गांभीर्य पाहता व ग्राहकांच्या झालेल्या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी कक्षाचे सचिव निखिल सावंत यांनी लोकसभा समन्वयक संजय पावले, कक्ष विधानसभा संघटक विक्रम शहा यांना टाटा कॅपिटलच्या वरिष्ठ अधिकाऱयांना भेटण्याच्या सूचना दिल्या.

 कंपनीने चूक केली मान्य

ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱयांनी  तत्काळ टाटा कॅपिटलच्या मुख्य कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱयांना जाब विचारला असता अधिकाऱयांनी सदर लोनसंदर्भात माहिती घेऊन आपली चूक झाल्याचे कबूल केले तसेच ग्राहकांनी 1 लाख 32 हजार रुपयांचे लोन घेतल्याचे मान्य केले तसेच अधिकचे आकारण्यात आलेले व्याज काढले गेले तसे पत्र ग्राहकाला देण्यात आले. कर्जाची रक्कम भरल्यानंतर लगेच लोन अकाऊंट क्लोज करण्यात आले.

ग्राहकाने मानले शिवसेनेचे आभार 

न्याय मिळाल्याबद्दल ग्राहक ठाकूर यांनी ग्राहक संरक्षण कक्षाचे आभार मानल़े यावेळी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, कार्यकारी सदस्य बबन सकपाळ, लोकसभा कक्ष समन्वयक संजय पावले, गोरेगाव कक्ष विधानसभा संघटक विक्रम शाह, कक्ष विधानसभा संघटक अॅड. लोकेगावकर, कक्ष वॉर्ड संघटक हरीश व्यास उपस्थित होते.