दिघा रेल्वे स्टेशनचे शिवसैनिकांनी केले उद्घाटन, भगवे झेंडे फडकवत शिवसेना झिंदाबादच्या गगनभेदी घोषणा

आठ महिन्यांपूर्वीच तयार होऊन धूळ खात पडलेल्या नवी मुंबई व ठाण्याला जोडणाऱया दिघा रेल्वे स्थानकाचे आज शिवसैनिकांनी दणक्यात उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलवे येथील कार्यक्रमातून उद्घाटनाची कळ दाबली, मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी दिघा स्थानकावर पहिला थांबा घेणाऱया लोकलचे भगवे झेंडे फडकावत प्रचंड जल्लोषात स्वागत केले.

शिवसेना नेते, खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक तयार झाले. ते बांधून सात ते आठ महिने उलटले तरी त्याचे लोकार्पण मात्र झाले नाही. दिघा स्थानक सुरू व्हावे यासाठी शिवसैनिकांनी अनेकदा आंदोलने केली. गेल्याच आठवडय़ात शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी दिघा स्थानकावर धडक देत स्वाक्षरी मोहीम राबवली. या स्थानकाचे लवकरात लवकर लोकार्पण झाले नाही तर जनतेच्या सोयीसाठी आपण स्वतः उद्घाटन करू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. त्यानंतर अखेर आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. मात्र शिवसैनिकांनी प्रत्यक्ष स्थानकात जाऊन पहिला थांबा मिळालेल्या लोकलला भगवा झेंडा दाखवला.

शिवसैनिकांचा जल्लोष सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या नावाचा जयघोष करीत स्वतःकडे श्रेय लाटत होते. पण शिवसैनिकांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी दिघा स्थानक दणाणून सोडले. खासदार राजन विचारे यांनी दिघा स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला.

यावेळी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ठाणे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर, राजू शिरोडकर, प्रशांत सातपुते, प्रतीक राणे, राजू मोरे, माजी परिवहन सदस्य राजू महाडिक, नगरसेवक संजय दळवी, विशाल मेड, अमोल हिंगे, महिला आघाडीच्या प्रमिला भांगे, ज्योती कोळी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

संजीव नाईक यांचा काढता पाय

उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपचे संजीव नाईक हेदेखील दिघा स्थानकात आले होते. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या घोषणा देत असताना शिवसैनिकांनी त्यास मुँहतोड जबाब दिला. शिवसैनिकांच्या प्रत्युत्तरामुळे वैतागलेले संजीव नाईक यांनी काढता पाय घेतला.

झुकेगा नही साला.. ठाण्यातील आजींनीही आवाज दिला

मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला येण्याची नौटंकी करणाऱया राणा दाम्पत्यांविरोधात परळमधील एका आजीबाईंनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी होत ‘झुकेगा नही साला’ असा आवाज दिला होता. आज दिघा रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱया शिवसैनिकांमध्ये 72 वर्षांच्या सुनंदा देशपांडे या आजीबाईदेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी हातात झेंडा घेऊन ‘झुपेंगा नही साला’ असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच ‘आवाज’ दिला. शिवसैनिकांच्या खांद्यावर बसलेल्या सुनंदा देशपांडे आजींनी हम किसीसे कम नही, अशा थाटात रणरागिणीचेच रूप धारण केले.
z ऐरोलीवरून येणाऱया लोकलला दिघा स्थानकात थांबा देण्यात आला. त्यानंतर गाडीच्या मोटरमनचा खासदार राजन विचारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी रेल्वेचे सहाय्यक प्रबंधक अखलख अहमद, प्रकल्प अधिकारी बी. के. जहा, आर. एल. पाल, डीसीएम अरुण कुमार आदी उपस्थित होते.