जय भवानी, जय शिवाजी! राज्यासह देशभरात शिवजयंती उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीचा उत्साह राज्यासह देशभरात पाहायला मिळाला. शिवनेरी किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुंबईतही शिवजयंती मंडळे आणि सोसायटय़ांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम, समरगीतांचे, पोवाडय़ांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालिका आयुक्त-प्रशासक इकबालसिंह चहल, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव उपस्थित होते.

सीमेवर मराठा लाईट इन्फ्रंटीकडून जयघोष

कश्मीरमधील कुपवाडा जिह्यात सीमेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंटच्या (एमएलआयआर) जवानांनी हिमवर्षाव सुरू असतानाही अभिवादन केले. मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंटचे घोषवाक्यच आहे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय’. यावेळी मराठा जवानांकडून एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज की, जय’ अशी सिंहगर्जना करून महाराजांचा जयघोष करण्यात आला.

गेट वे ऑफ इंडिया, पालिका मुख्यालयात अभिवादन

गेट वे ऑफ इंडिया येथे सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी 7 ते 9 या वेळेत चौघडा व सनईवादनाने वातावरण प्रफुल्लित झाले. त्यानंतर श्री शिवछत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी शिवरायांची आरती सादर केली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सरचिटणीस संजय शेटे, ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महापालिका मुख्यालयातील पालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळय़ाला महापालिकेच्या वतीने एफ-दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराजांना मानवंदना

भारतीय कामगार सेना व मुंबई विमानतळ प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. बीव्हीजी इंडिया लि. पंपनीतील कर्मचारी प्रदीप जाधव यांच्या 9 वर्षांचा मुलगा अथर्व आणि त्याच्या सहकाऱयांनी महाराजांवर पोवाडा सादर केला. शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, सरचिटणीस सचिन अहिर, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे व्हीपी श्रीकांत पवार, जीएम राजेश म्हात्रे, चीफ हॉस्पिटलिटी ऑफिसर राजीव चावला, एजीएम मुकेश शर्मा, विविध पंपन्यांतील व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मयूर वणकर, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, दिलीप भट, पोपट बेदरकर, सहचिटणीस जगदीश निकम, विजय शिर्पे, मिलिंद तावडे, दिनेश पाटील, निलेश ठाणगे, संजीव राऊत, विजय तावडे, विनायक शिर्पे, दिनेश परब, सर्व कमिटी सदस्य आणि कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि मान्यवरांचे स्वागत भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी केले.

मुंबई काँग्रेस 192 ब्लॉक अध्यक्ष दीपक वाघमारे यांच्यासह धनंजय खाटपे, शिवसह्याद्री संघटनेचे अध्यक्ष आनंद यादव, प्रदेश प्रतिनिधी अतीत मयेकर, माजी ब्लॉक अध्यक्ष सचिन भोसले, नील पाखरे आदी कार्यकर्त्यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला अभिवादन केले.

मध्य रेल्वेच्या ट्रेन मॅनेजर आणि मोटरमन संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकावर शिवजयंती मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी साडेतीन शक्तिपीठांसह महाराजांचा सिंहासनाधिष्ठाrत देखावा उभारण्यात आला होता.

 

किल्ले शिवनेरी गडावर बाल शिवरायांची पालखी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी गडावर मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायला. बाल शिवरायांची पालखी काढण्यात आली. यंदाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार हा पोलीस दलातील कार्यक्षम अधिकारी दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. ब्रिगेडियर अनिल काकडे व शास्त्र्ाज्ञ रवींद्र साबळे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देण्यात आला.

  • छत्रपती शिवाजी महाराजांसह माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांसह मावळ्यांच्या वेशभूषा करून जुन्नर तालुक्यात आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली.