तीन गावठी बनावटीच्या पिस्तुल, काडतुसांसह तिघांना घेतले ताब्यात – शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर पोलिसांना विश्वसनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिरूरचे पोलीस निरिक्षक संजय जगताप यांनी पथकामार्फत सापळा रचून ३ गावठी बनावटीचे पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेल्या इंडिव्हर वाहनासह तिघांना ताब्यात घेतले.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दि.३१ डिसेंबर रोजी मध्यप्रदेश येथुन निखिल एकनाथ चोरे (रा.डोंगरगण, ता. शिरूर, जि.पुणे) हा शिरूर एस. टी.स्टॅड येथे येणार असल्याची टिप बातमीदारा मार्फत शिरुर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने पथक तयार करून पंचांना सोबत घेतले आणि शिरूर बस स्थानकात सापळा रचला. शिरूर एस.टी.बस स्थानकातील मोकळ्या जागेत निखिल येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळील बॅगमधुन २५ हजार ४०० रूपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल, ४ जिवंत काडतूस तसेच एक निळ्या रंगाची बॅग असा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आणि आरोपी विरूद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी निखील एकनाथ चोरे यास ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी केली असता निखिल याने सदरचे पिस्तुल व जिवंत राऊड उमरटी, मध्यप्रदेश येथुन आणल्याची माहिती दिली. त्याचा सोबत विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी देखील त्यांच्याकडे असणाऱ्या फोर्ड कंपनीच्या एन्डेवर गाडीमध्ये उमरटी, मध्यप्रदेश येथुन २ पिस्तुल व ६ राऊंड आणल्याचे सांगितल्यानंतर आरोपी विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५० हजार ८०० रूपये किंमतीचे २ पिस्तुल, ६ जिवंत राऊंड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली २० लाख रुपये किंमतीची फोर्ड कंपनीची एन्डेव्हर गाडी हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यात एकूण ७६ हजार २०० रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे एकूण ३ पिस्तुल व १० जिवंत राऊंड असे आरोपी निखिल एकनाथ चोरे (वय २०) विकास बाबाजी चोरे (वय २२) शुभम सुरेश चोरे (वय २०) सर्व राहणार डोंगरगण ता.शिरूर जि.पुणे यांच्याकडून हस्तगत करण्यात आले असून त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, पोलीस हवालदार परशुराम सांगळे, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दिपक पवार यांनी केलेली आहे.

सदर तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ जानेवारी पर्यंत पोलीस रिमांड देण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.