आता पंजाबमध्ये फोडाफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न?, आणखी एका मित्रपक्षाचा भाजपवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत ‘ अब की बार, चार सौ पार ‘ च्या स्वप्नाची धुळधाण उडूनही भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता अशाच प्रकारचे फोडाफोडीचे ‘ऑपरेशन लोटस’ पंजाबमध्ये राबवले जात आहे. जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलामध्ये भाजपने अंतर्गत वादाचा भडका उडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परमजीत सिंह सरना यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांच्या मदतीवर सरकार स्थापन करावे लागले आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडी करायची आणि प्रादेशिक पक्षांना कमजोर करायचे हे उद्योग भाजपने सुरू केले आहेत, असा गंभीर आरोप परमजीत सिंह सरना यांनी केला आहे.

शिरोमणी अकाली दलाचे पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात बंड

लोकसभा निवडणुकीत अकाली दलाच्या पराभवानंतर शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) वरिष्ठ नेत्यांच्या एका गटाने पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. बादल यांनी पक्षप्रमुखपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी करीत नाराज गटाने बादल यांच्याविरोधात तसा ठराव मंजूर केला आहे. या नाराज गटाला भाजपकडूनच फूस लावण्यात आल्याचा आरोप होत आहे.

‘भाजपच्या फोडाफोडीबाबत मी लेखी स्वरुपात आरोप केलेले आहेत. भाजपला माझे आरोप खोटे वाटत असतील तर त्यांनी माझ्या आरोपांवर प्रत्युत्तर द्यावे’, असं आव्हान परमजीत सिंह यांनी दिलं आहे. ‘ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा आरोप सिद्ध करुन दाखवेन’, असा निर्धार परमजीत सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

जे महाराष्ट्रात केले, तेच पंजाबमध्ये ही करण्याचे कारस्थान!

भाजपच्या कुटील कारस्थानावर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्या पक्षात भाजपने अंतर्गत वादाची ठिणगी पाडली आहे. मात्र या विरोधात संपूर्ण शिरोमणी अकाली दल एकवटला आहे आणि सुखबीर बादल यांच्या पाठीशी उभा आहे. जे महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत केले, तेच पंजाबमध्ये आमच्या पक्षाच्या बाबतीत करण्याचा कट भाजपने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून सुरू केला आहे’, असा घणाघाती आरोप हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे.