मिंधे सरकार नराधमांना पाठीशी घालतंय! महाराष्ट्राच्या गावागावात बहिणींच्या सुरक्षेसाठी जनता रस्त्यावर

शिवसेना भवनाजवळ भरपावसात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची निदर्शने

पुण्यात मुसळधार पावसात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे मूक आंदोलन

महाविकास आघाडी आक्रमक! बाळासाहेब थोरातांचा संगमनेर येथे ठिय्या

बंदला बंदी घालण्यात आल्यानंतर शनिवारी महाविकास आघाडीने मूक आंदोलनाचा तडाखा मिंधे सरकारला दिला. बदलापुरातील भयंकर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेवर आवाज उठवण्यासाठी मुंबईसह राज्यभरात संतप्त निदर्शने करण्यात आली. ‘नराधमांना फाशी झालीच पाहिजे’, ‘मिंधे सरकार चले जाव’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. मुंबईत भरपावसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यात आले. पुण्यातही मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त केला गेला, तर संगमनेरात काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या झाला. महाविकास आघाडीने आक्रमक होत निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांना फैलावर घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला असताना मिंधे सरकार निर्लज्जपणे नराधमांना पाठीशी घालत आहे. लाडक्या बहिणी आणि त्यांच्या लेकी असुरक्षित आहेत आणि कंसमामा हातावर राख्या बांधून घेत फिरतो आहे. महिलांना, लेकींना सुरक्षा देण्याऐवजी नराधमांना पाठीशी घालणारे हे निर्लज्ज सरकार घालवावेच लागेल, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असलेल्या महिला अत्याचाऱ्याच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज 24 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ‘महाराष्ट्र बंद’वर ‘बंदी’ घातल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत महाविकास आघाडीने ‘बंद’चा निर्णय मागे घेतला, मात्र मुंबईसह संपूर्ण राज्यभरात महिला अत्याचारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसेना भवनाजवळ  निदर्शन करण्यात आली. यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना विधिमंडळ नेते अजय चौधरी, खासदार प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, सुनील शिंदे, विशाखा राऊत, मनोज जामसुतकर, संजना घाडी, महादेव देवळे, विभाग प्रमुख महेश सावंत, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, अंजली नाईक, शीतल शेठ-देवरुखकर, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी आणि जनता सहभागी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रलंबित शक्ती कायदा, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, शिवसेनेने पुकारलेल्या बंदवर न्यायालयाने आणलेली बंदी यावर मार्गदर्शन केले. महिलांना सुरक्षा देण्याऐवजी नराधमांना पाठीशी घालणारे निर्लज्ज सरकार घालवावेच लागेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात विकृत सरकार

राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत असल्याने पुकारलेल्या आंदोलनात अडथळा आणणारे इतके निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिले नव्हते, असा घणाघातही त्यांनी केला. हा लढा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. साधुसंतांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे आम्ही केवळ आदराने नाही तर संस्कारक्षम महाराष्ट्र म्हणून घेतो, असे ते म्हणाले. हे आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृती असे आहे. आंदोलनात उतरलेली संस्कारी मनांची आणि संस्कारी माणसे आहेत. एका बाजूला विकृत नराधम, त्यांच्यावर पांघरूण घालणारे विकृत सरकार आणि त्या नराधमाची बाजू मांडणारे विकृत याचिकाकर्ते  त्यांच्याविरुद्ध संस्कृतीचा हा लढा असल्याचेही ते म्हणाले.

सरकारमध्ये संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही

बदलापूरमध्ये दुष्कृत्य झाल्यावर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. आज आपण बंद पुकारला होता महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सरकारला झाली. मात्र संकटांचा सामना व बंदोबस्त  करण्याची सरकारची हिंमत आणि ताकदही नाही, असे हे निर्ढावलेले सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यावर राज्य करीत असल्याचे ते म्हणाले. तुम्ही आमचा बंद जरी बंद केलात तरी आमचा आवाज कोणी बंद करू शकणार नाही. आमचा आवाज यापेक्षाही मोठा होईल, असेही त्यांनी बजावले. हे सरकार अत्याचाऱ्यांना पाठीशी घालणार असेल शिवसैनिक म्हणून आम्ही आमच्या माता-भगिंनीचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

शक्ती कायद्यावरील धूळ झटका!

आमच्या राज्यात आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे. हा आमचा अट्टहास असल्याचे सांगून ते म्हणाले की, आम्ही शक्ती कायदा केला. आता तो राष्ट्रपतींकडे पाठवला गेला आहे आता देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. त्यांनाही मी जाहीर आवाहन करीत आहे की, माता-भगिंनीचे रक्षण करणारा शक्ती कायदा मागील एक-दोन वर्षांपासून राष्ट्रपती कार्यालयात धूळ खात पडला आहे. राष्ट्रपतींनी कृपा करावी, कायद्यावरील धूळ झटकावी आणि या सरकारलाही झटकावे आणि तो कायदा महाराष्ट्रात अमलात आणा, अशी जाहीर विनंती मी राष्ट्रपतींना-सरकारला करीत आहे.

तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही

महिलांना सुरक्षा देऊन नराधमांना कठोर शिक्षा द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. असे असताना आमच्या आंदोलनात सरकारकडून जाणीवपूर्वक अडथळा आणला गेला. तुम्ही बंदला बंदी करू शकता, मात्र आमचा आवाज दाबू शकत नाही, असा कडक इशारा देत महाराष्ट्राच्या हृदयामध्ये, घराघरात अत्याचाराविरोधात आणि निर्ढावलेल्या सरकारविरोधात मशाल धगधगत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जागते रहो!

प्रत्येक घरात एक चिंता आहे, माझी मुलगी शाळेत बहीण, आई ऑफिसमध्ये  जाते. पण ती सुरक्षित आहे का? त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागत आहे. हे सरकार आता घालवावेच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. जागे रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोर्टाने अशीच तत्परता दाखवावी

बंदवर न्यायालयाने बंदी आणल्याचे सांगताना ते म्हणाले की,  शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात आहे. दोन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. पण न्यायालय एवढय़ा तत्परतेने हलू शकते हे कोर्टाने बंदसंदर्भातील निर्णयाने दाखवून दिले. कोर्टाने ठरवले तर कोर्ट तत्काळ निर्णय घेऊ शकते, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

नराधमांना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा करा

महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने राज्यभरात संताप निर्माण झाला असताना सरकार नराधमांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतेय. सरकारचे काही ‘सदा आवडते’ आंदोलनाच्या मध्ये येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या आठवडय़ात भारत बंद झाला होता. आपल्या राज्यात तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांत रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सर्व याचिकाकर्ते कुठे गेले होते? का त्या बंदला विरोध  केला नव्हता? पाठीशी घालणारे हे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील, पण  जो कोणी महिलांवर अत्याचार करतील त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

सह्यांची मोहीम सुरू करा

सरकारला जागे ठेवण्यासाठी पुढचा काही काळ गावागावात, बस डेपो, रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टँड अशा ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवा. हे आंदोलन थांबता कामा नये. या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवून या सह्या आपण न्यायालयात सादर करून आपण आंदोलन कशासाठी करीत होतो याची माहिती देऊ, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, असेही ते म्हणाले.

सरकारला आज कळलं असेल. त्यांनी आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराच्या घटनांविरुद्ध आणि मिंधे सरकारविरुद्ध एक मशाल धगधगते आहे हे ध्यानात ठेवा.

घोषणांचा दणका

फाशी द्या फाशी द्या… नराधमांना फाशी द्या

चिमुकलीला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा

झालाच पाहिजे, झालाच पाहिजे…शक्ती कायदा झालाच पाहिजे

नको आम्हाला पंधराशे, आम्हाला हवी सुरक्षा

टरबुजा गृहमंत्र्याचं करायचं काय, खाली डोपं वर पाय