ज्ञानेश्वर तांबेच्या शोधासाठी शिक्रापूर पोलीस पंढरपुरात

शिरूर तालुक्यातील वरुडे गावातील ज्ञानेश्वर तांबे हे तीन वर्षांपासून बेपत्ता असून, त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर दिसल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अखेर तीन वर्षांनी तांबे हे बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदवली असून शिक्रापूर पोलिसांचे पथक तांबेच्या शोधासाठी पंढरपुरात दाखल झाले आहे. तेथे साध्या वेशात ज्ञानेश्वर तांबे यांचा शोध घेतला जात आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेच्या जाहिरात फलकावर वरुडे गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा फोटो झळकल्याने एकच खळबळ उडाली. तांबे यांच्या कुटुंबीयांकडूनदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ज्ञानेश्वर तांबे हे तीन वर्षांपासून बेपत्ता असताना कुटुंबीयांनी शोध घेऊन ते मिळाले नाही. अचानक मुख्यमंत्र्यांच्या वतीने काढलेल्या ‘ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन’ या जाहिरातवर ज्ञानेश्वर तांबेंचा फोटो आल्याने मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला वडिलांचे दर्शन घडवून द्यावे, अशी मागणी ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी भारत ज्ञानेश्वर तांबे (वय 41, रा. वरुडे, ता. शिरूर) यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर हे बेपत्ता झाल्याबाबत नोंद केली.

पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस नाईक विकास पाटील, जयराज देवकर यांनी साध्या वेशात थेट पंढरपूर गाठत मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये असलेल्या बेपत्ता ज्ञानेश्वर यांचा पंढरपूरमधील धर्मशाळा, मठ, मंदिर परिसर, वाळवंट, चंद्रभागेच्या तीरी सर्वत्र शोध घेतला. यासाठी पंढरपूर पोलिसांची मदत घेत तांबे यांच्या शोधकार्याबाबत पत्रकेदेखील चिटकवली आहेत. ज्ञानेश्वर तांबे हे कोठे आढळून आले, तर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनदेखील पोलिसांनी केले आहे.