‘गब्बर’चा क्रिकेटला रामराम! सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

‘गब्बर’ या टोपण नावाने क्रिकेटविश्वात फेमस असलेला टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली. ‘जो डर गया, वो मर गया’ अशा थाटात गब्बर फलंदाजी करायचा. वयाच्या एकोणचाळिशीकडे झुकलेल्या धवनने शनिवारी (दि. 24) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या निवृत्तीची माहिती दिली.

शिखर धवन बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याच्या पुनरागमनाची आशा नव्हती. अशा स्थितीत त्याने अखेर क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. धवनने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शिखर धवन हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. विशेष म्हणजे एकदा मैदानावर उतरल्यानंतर तो आक्रमकपणे खेळून समोरची गोलंदाजी फोडून काढायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच हिंदुस्थानी संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 टी-20 सामने खेळलेले आहेत. शिखर धवनने कसोटीत 7 शतके आणि 5 अर्धशतकांसह 2315 धावा केल्या असून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 शतके व 39 अर्धशतकांसह 6793 धावांची लयलूट केलीय. टी-20 तही त्याने 11 अर्धशतकांसह 1759 धावा चोपल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गब्बरनावाचा किस्सा

रणजी चषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाने मोठी भागीदारी केल्याने पंजाब संघातील सर्वच खेळाडू निराश होते. अशा परिस्थितीत शिखर धवन जोरात ओरडला, ‘बहुत याराना है सुअर के बच्चो’ यानंतर सर्व खेळाडू जोरजोरात हसायला लागले. त्याच दिवसापासून संघाच्या प्रशिक्षकांनी (विजय) शिखर धवनचे नाव ‘गब्बर’ ठेवले. हे नाव नंतर इतके प्रसिद्ध झाले की जगभरातील क्रिकेट चाहते आताही त्याला ‘गब्बर’ या नावानेच संबोधतात.