देशाला कृषिमंत्री नसणे, हे दुर्दैव! प्रचंड गर्दीत ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा पुण्यात समारोप

कृषिप्रधान देशाला कृषिमंत्री नसणे ही सर्वांत दुर्दैवाची बाब आहे. लोकांना सध्याच्या सरकारमधील कृषिमंत्री कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांना कृषिमंत्र्याचे नाव सांगता येत नाही, हे केंद्रातील भाजप सरकारचे अपयश आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. देशाची भूक भागवणाऱ्या, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांना आक्रोश मोर्चा काढावा लागतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून काढण्यात आलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा समारोप आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रवींद्र धंगेकर यावेळी उपस्थित होते.

सरकार झाले बेपत्ता – सुप्रिया सुळे
‘एक रुपया कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, अशी सध्याच्या सरकारची स्थिती झाली आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांबरोबर सध्या महाराष्ट्रापुढे पाण्याची गंभीर समस्या उभी आहे. मात्र, ट्रीपल इंजिन, खोके सरकारला शेतकरी प्रश्न, पाणीप्रश्न, अंगणवाडीसेविका, आरक्षणाबाबतच्या प्रश्नांबाबत गांभीर्य नाही. राज्यातील हे प्रश्न सुटले नाही, तर ट्रीपल इंजिन सरकारमधील मंत्र्यांना लोक रस्त्यावरून फिरू देणार नाहीत, अशी तोफ यावेळी सुप्रिया सुळे यांनी डागली.