लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. 4 जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शशी थरुर पुढे म्हणाले की, जात, धर्म, भाषा, प्रांत कोणताही असो सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत असे संविधानाने स्पष्ट केले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार तसा नाही. भाजपाने नागरिकता मध्ये धर्म आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे जे शब्द वापरत आहेत ते शब्द आपण बंद घरातही वापरू शकत नाही, हे अत्यंत लांछनास्पद असून देश आणि राजकारणातही ते योग्य नाही. भाजपाचे राजकारण पाहता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढाईत भाग घेतला आहे. 4 जूननंतर खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचा विकास करणारे व सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार येईल.
निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर बोलत नाही. जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून गैरमहत्वाच्या मुद्द्यावरच भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे पण मोदींनी ते स्वीकारले नाही. युपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी योग्य समन्वय असून सर्व पक्ष एकत्र येऊन प्रचार करत आहेत. भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले असले तरी कार्यकर्ते मात्र मुळ पक्षाबरोबच आहेत. मविआ- इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय आहे तसा समन्वय एनडीएमध्ये मात्र दिसत नाही, असेही शरी थरूर म्हणाले.
या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, विधान सभेतील उपनेते आमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अनिस अहमद इद्रिसी यांनी काँग्रेस पक्षात केला.