‘छोडो भाजप… भाजप से मुक्ती’ नारा द्या, शरद पवार यांची साद

मोदी गॅरंटीचा गवगवा केला जात आहे, पण ही गॅरंटी खोटी आहे. ही गॅरंटी आता चालणार नाही. या गॅरंटीत कोणतीच हमी नाही. केवळ फसवाफसवी आहे.

देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, दलितांना आश्वासने दिली पण ती पाळली नाहीत. लोकांची फसवणूक करणाऱयांना आता हटवण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांनी 1942मध्ये याच मुंबईतून भारत छोडोचा नारा दिला होता. आज त्याच मुंबई शहरातून ‘छोडो भाजप… भाजप से मुक्ती’ हा नारा दिला पाहिजे, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घातली.

शरद पवार यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला. आज हिंदुस्थानाच्या स्थितीत बदल आणण्याची गरज आहे. आज ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी देशातील शेतकरी, कामगार, तरुण-तरुणी, महिला, दलित, आदिवासींना आश्वासने दिली, पण ती पूर्ण केली नाहीत. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करीत नाहीत त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला पावले उचलली पाहिजेत. ही संधी पुढील महिन्यात आपल्यालाला मिळणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज या वेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणात ‘मोदी गॅरेंटी’ची घोषणा करीत होते. त्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून टीव्हीवर दररोज मोदींची गॅरेटी ऐकत आहोत. पण त्यांनी खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. पण आता टीव्हीवर मोदींची गॅरेंटी येणार नाही. मोदींची गॅरेंटी रोखण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे त्याबद्दल आपण निवडणूक आयोगाला धन्यवाद दिले पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले.

इंडिया आघाडीच्या सभेला देशाच्या विविध भागांतून आणि राजकीय नेत्यांनी मुंबईतील सभेला उपस्थिती लावली त्याचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले की, याच शहरातून महात्मा गांधी यांनी 1942मध्ये ब्रिटिशांना ‘छोडो हिंदुस्थान’, ‘छोडो हुकूमत’ असा नारा दिला होता. आज याच शहरातून ‘छोडो भाजप’ नारा दिला पाहिजे.

यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, सीपीआय (एम) चे दीपांकर भट्टाचार्य, आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, केरळचे नेते सादिक अली थंगल, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. व्यासपीठावर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ खासदार वायको, टी. आर. बालू, शिवसेना उपनेते पराग डाके, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधीमंडळ गटनेते अजय चौधरी, विलास पोतनीस, सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.