हा दमदार नाही दिवटय़ा आमदार, याला सत्तेची मस्ती, शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना फोडून काढले

पुण्यातील पोर्शे कार अपघातावेळी अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोडून काढले. आरोपीला वाचवणारा हा कसला दमदार आमदार. हा तर दिवटय़ा आहे, याला सत्तेची मस्ती आली आहे, अशी तोफ डागली.

सुनील टिंगरे तू पुणाच्या पक्षातून निवडून आलास? हा पक्ष कोणी काढला, सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे. या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला ते ठिक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, असे नमूद करत शरद पवार यांनी टिंगरे यांना फैलावर घेतले. दोन तरुण मुलांना कारने उडवलं, जागच्या जागी त्यांची हत्याच झाली, अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवटय़ा आमदार पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यासाठीच मते मागितली होती का? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मतं मागितली. आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीने केलं का, असा सवाल पवारांनी केला.

सत्तेत असताना औद्योगिकरणाच्या माध्यमातून आम्ही पुण्याचा चेहरा बदलला पण सध्याच्या राज्यकर्त्यांमुळे पुण्याची कोयता गँग म्हणून ओळख झाल्याचा आरोप पवारांनी केला.