शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, पण बड्या उद्योगपतींचे लाखो-कोटी माफ केले! हीच काय मोदींची गॅरंटी!!

देशाचा कृषीमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आपण शेतकऱयांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरवण्यासाठी तब्बल 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र आज शेतकरी मोठय़ा संख्येने आत्महत्या करीत असताना मोदी त्यांच्याकडे ढुंकून पहायलाही तयार नाहीत. त्यांनी शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याऐवजी बडय़ा उद्योगपतींचे लाखो-कोटींचे कर्ज माफ केले. हे योग्य नाही, असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी आज केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. सत्ता लोकांच्या हितासाठी वापरायची असते हे मोदींना माहीत नाही. कुणीही पंतप्रधान झाला तर त्याने संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे. मात्र गेल्या दहा वर्षांत मोदींनी फक्त गुजरातचाच विचार केला आहे. हीच का मोदी गॅरंटी,असा टोलाही त्यांनी लगावला. बाकीची राज्ये भुकेपंगाल ठेवायची आणि फक्त गुजरातचाच विचार करायचा, असा कारभार सध्या मोदींकडून सुरू आहे. याचाच अर्थ असा की, ‘मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, ते केवळ एका राज्याचे पंतप्रधान आहेत’ असा घणाघातही शरद पवार यांनी केला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माजी आमदार शशिकांत शिंदे, कुलदीप काsंडे, शंकर मांडेकर, माउली शिंदे, रवींद्र बांदल व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ता लोकांच्या हितासाठी वापरायची असते, लोकांना त्रास देण्यासाठी नव्हे

‘अच्छे दिन’ आणि ‘काळा पैसा शेतकऱयांसाठी’ देशात परत आणण्याचे स्वप्न दाखवत भाजपने दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळवली. मात्र शेतकऱयांना अद्याप एक दमडीही मिळाली नाही. शेतकरी अजूनही आत्महत्या करताहेत. महागाईचा प्रश्न प्रचंड गंभीर बनला आहे. तरुणांची संख्या देशाचे भवितव्य आणि भविष्यासाठी वापरली जाण्याची गरज असताना त्यांना बेकार ठेवून संकटात ढकलण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाबाबत आवाज उठवणाऱयांना तुरुंगात डांबून भाजपमध्ये येण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा घणाघात करीत ‘सत्ता लोकांच्या हितासाठी वापरायची असते, लोकांना त्रास देण्यासाठी नव्हे’ असा सणसणीत टोलाही शरद पवार यांनी आज भाजपला लगावला.

गद्दारांना माफी नाही!
महाराष्ट्राने याअगोदर अनेक आक्रमणे परतवून लावली आहेत. काही लोकांनी गद्दारी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले, मात्र आता आपलेच सरकार येणार आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱयांची कर्जमाफी नक्कीच करणार, पण गद्दारांना कदापि माफी नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला.

चोर, लफंगे आणि ढोंगी माणसे देशावर राज्य करीत आहेत. ‘जय श्रीराम’च्या घोषणा ते देतात, पण प्रभू श्रीराम सत्यवचनी, एकनिष्ठ, कुटुंबवत्सल होते. हे ढोंगी लोक मात्र ‘मेरा देश, मेरा परिवार’ अशा घोषणा देतात आणि पह्टो काढताना मध्ये आलेल्या मंत्र्याला ढकलतात, हाच यांचा परिवार का? शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. कश्मिरी पंडितांची घरवापसी झाली नाही. मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली जाते. सीमेवर जवान शहीद होतात, हा त्यांचा परिवार नाही का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला.

बदल घडवून आणण्याला आता गत्यंतर नाही!

भाजपकडून सध्या दबावाचे राजकारण केले जात आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकले. मात्र यानंतर कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. सरकार सध्या सत्तेचा गैरवापर करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सरकारच्या या दडपशाहीला आवर घालून बदल घडवून आणण्याला आता गत्यंतर नाही. त्यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीत तुतारी चिन्हाच्या समोरील बटन दाबून महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित जनतेला केले.

सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी यावेळी शरद पवार यांनी जाहीर केली. मतदारांनी दिलेली साथ आणि केलेल्या विकासामुळे त्यांना जनतेने सलग तीन वेळा निवडून दिले. संसदेचे उत्तम सभासद म्हणून त्यांना सात वेळा बहुमान मिळाला. संसदेत त्यांची 98 टक्के उपस्थिती असते. लोकांसाठी काम करणाऱया सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पुन्हा एकदा रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.