मोदींच्या हातून सत्ता काढून घेतलीच पाहिजे! शरद पवार यांनी ठणकावले

यंदाची लोकसभेची निवडणूक साधी सोपी नाही. या निवडणुकीत एखादी जरी चूक झाली तर त्याची किंमत आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला मोजावी लागेल. पुढच्या पिढीला प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचे असेल तर ‘अब की बार भाजप तडीपार’ ही घोषणा ती कृतीत आली पाहिजे. मोदींच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

उत्तर -पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत हंडोरे, आमदार सुनील राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, उपनेते दत्ता दळवी, जान्हवी सावंत उपस्थित होते.

मोदींच्या हुकूमशाहीचा समाचार घेताना शरद पवार पुढे म्हणाले की, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. पण लोकशाहीत आज सत्तेचा गैरवापर कसा होतो हे मोदी दाखवतात. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या प्रश्नावर केंद्रावर टीका केली, आदिवासींचे म्हणणे दिल्लीत मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम काय झाला तर आज झारखंडचे मुख्यमंत्री एक वर्षापासून जेलमध्ये आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण, आरोग्याच्या अतिशय चांगल्या सुविधा दिल्या. त्यांनी केंद्रावर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. मोदींवर टीका केली म्हणून जेलमध्ये टाकले. ‘सामना’चे संपादक संजय राऊत हे महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात टीकाटिपण्णी करतात म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही जेलमध्ये टाकले. स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला, टिकाटिप्पणी केली त्यावेळेला तुरुंगवास ही नित्याची बाब होती. ब्रिटिशांच्या विरोधात आपले पूर्वज लढले. स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांच्या विरुद्ध लढले आणि इंग्रजांची हुकूमशाही घालवली. इंग्रजांनी हुकूमशाहीच्या रस्त्याची जी भूमिका घेतली. तीचा स्वीकार करून पंतप्रधान मोदींनी करून पावले टाकायला सुरूवात केली आहे. हे संकट साधे नाही. या संकटापासून वाचायचे असेल तर सामूहिक शक्ती एकत्र केली पाहिजे असे सांगत संजय दिना पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हाची आणि महाराष्ट्राची आजची स्थिती यात फरक आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारखे नेते होते. माझ्याकडे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती. राज्यातील नेत्यांनी राज्याची सर्वांगीण प्रगती केली. मात्र आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधारी या राज्यात उभे राहिलेले कारखाने गुजरातकडे कसे जातील याची काळजी ते घेत आहेत. महाराष्ट्रातील कारखान्यांमधून इथल्या हाताला जे काम होते घालवून दुसऱया राज्यात न्यायचे हे महाराष्ट्रावर अन्याय करणारे आहे. ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यात नित्याने चाललेली आहे. आणि त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्रावर झाल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला.

महाराष्ट्राच्या अपमानाचा सूड घ्या – संजय राऊत

ते महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. या महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करतात. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा ते द्वेष आणि तिरस्कार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रफुल्ल पटेल ज्यांनी पक्षांतर केले, ज्यांनी बेईमानी केली त्या प्रफुल्ल पटेल यांनी त्या बेईमानाच्या सरदाराच्या डोक्यावर जिरेटोप ठेवला. हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या अपमानाचा सूड आपण सर्वांनी घेतला पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थितांना केले.