महाविकास आघाडीचे जागावाटप दहा दिवसांत ठरणार, तिन्ही पक्षांत एकवाक्यता

महाविकास आघाडी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जागावाटपाबाबत बैठका घेतल्या जात आहेत. जागावाटपाबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता आहे. जागावाटप अंतिम झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी कोण उमेदवार उभा करायचा हे ठरेल आणि महाविकास आघाडीचे हे जागावाटप येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.

शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू असल्याचेही ते म्हणाले. जागांचा अभ्यास, जनतेचा काwल आणि इतर बाबींचाही विचार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवा

आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवला गेला पाहिजे. कारण जात, धर्म काही असला तरी शेवटी आपण सगळे भारतीय आहोत. सरकारनेही अशा प्रश्नांना विलंब लावू नये आणि हे प्रश्न सोडवून वातावरण कसे चांगले राहील हे सरकारने पाहिले पाहिजे, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली.