रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठय़ा प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या 137व्या जयंती समारंभात पवार बोलत होते. याप्रसंगी चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, प्रभाकर देशमुख, अरुण कडू-पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज दूर होता. त्यावेळी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम अण्णांनी केले. ज्यांना शिक्षण घेणे शक्य नाही अशा कुटुंबातील मुला-मुलींना तुम्ही कष्ट करा, कमवा आणि घाम गाळून शिका, शैक्षणिकदृष्टय़ा संपन्न व्हा, अशी योजना कर्मवीरांनी सुरू केली. या विचाराला पाठिंबा देणाऱया कार्यकर्त्यांची एक फळी तयार करायचे कामदेखील अण्णांनी केले. रामभाऊ नलावडे, तात्याराव तडसरकर, आप्पासाहेब पाटील अशा अनेक सहकाऱयांनी अण्णांची विचारधारा पुढे नेली.

अण्णांनी उत्तम नेते तयार केले. संस्था उभारण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी आणि संस्थेतील कमतरता दूर करण्यासाठी समाजासाठी समाजातून मदत गोळा करण्याचे काम करणारी टीम अण्णांच्या विचाराने तयार केली. हा विचार घेऊन काम करणाऱया रयत सेवक व रयत प्रेमी यांच्यामुळे देशात अग्रगण्य संस्था म्हणून रयतचा नावलौकिक आहे. संस्थेचा विस्तार होऊन त्यात लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे कर्मवीरांचे विचार हा फार महत्त्वाचा ठेवा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेस 25 लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे शकुंतला ठाकूर, रामशेठ ठाकूर, परेश ठाकूर, शुभांगी व महेंद्र घरत, नेताजी पवार, अनिल जवळेकर, यमुना सामाजिक संस्था, मैत्री मुव्हीज, राष्ट्रवादी वेल्फेअर फंड, अशोक बोरा इत्यादींचे सत्कार करण्यात आले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले.

कुंभोज, काले ही शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे

n राजर्षी शाहू महाराज, जोतिबा फुले यांची विचारधारा स्वीकारून कर्मवीरांनी आपले अख्खे आयुष्य शैक्षणिक विकासासाठी झोकून दिले. कुंभोज, काले ही दोन ठिकाणे कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय कर्मवीरांना द्यावे लागेल.

कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरी

n कर्मवीर जयंतीनिमित्त साताऱयातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीरांच्या चित्ररथासह सातारा शहरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच समाजसुधारकांच्या पुतळ्यांना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.