BJP-RSS मध्ये अस्वस्थता, शरद पवार यांचं मोठं विधान; अजित पवारांबाबतही स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजपसह महायुतीवर निशाणा साधला. महाराष्ट्रात भाजपने अजित पवार गटासोबत केलेल्या युतीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या एका साप्ताहिकातून टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच अजित पवारांबाबतही एक मोठे विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या दारुण पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायजरमधून पक्षाच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे अतिआत्मविश्वास बाळगणाऱ्या भाजपसाठी मोठा धडा आहे, असे ऑर्गनायजरने लिहिले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित महाराष्ट्रातील मराठी साप्ताहिकातून पुन्हा अजित पवार गटासोबतच्या युतीवरून निशाणा साधण्यात आला आहे. अजित पवार गटासोब केलेल्या युतीमुळे भाजपचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाला. तसेच निवडणुकीत दोन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचा टोला विवेकमधील एका लेखातून लगावण्यात आला आहे. यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत अतिशय सूचक वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार महायुतीत गेले त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे, असे विवेकमधील एका लेखात म्हटले आहे. यामुळे अजित पवार यांनी महायुतीत जाणे कितपत योग्य वाटते? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. ‘हा महायुतीमधील पक्षांचा प्रश्न आहे. आजच्या इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकात यासंदर्भात मी एक बातमी वाचली. विवेकने (आरएसएसशी संबंधित) यासंदर्भात लिहिले आहे. त्यावर ही बातमी आहे. यापूर्वी ऑर्गनायजरमधूनही अशाच प्रकारे लिखाण करण्यात आले होते. आता ऑर्गनायजर आणि विवेक यांच्या पाठिमागे कोणती विचारधारा आहे? याचा शोध घ्यावा लागेल’, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी करताच पत्रकार परिषदेत हशा पिकला. ‘ते ज्या अर्थाने म्हणताहेत त्यानुसार त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत, त्यांच्यात अस्वस्थता आहे हे स्पष्ट होतंय’, असे सूचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले.

अजित पवारांना परत घेणार का?

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्यांना घरात स्थान आहे. पण त्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबतचा निर्णय हा मी एकटा काही घेणार नाही. या संघर्षाच्या काळात माझे जे सर्व सहकारी भक्कमपणे उभे राहिले, त्यांना विचारूनच मग ठरवेन, असे शरद पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचं महाविकास आघाडीचं सूत्र

येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे नियोजन करण्याचा विचार करतोय. यासाठी काही कार्यक्रम घेऊन जायला लागतं. फार मोठा जाहीरनामा ठेवा, असं माझं म्हणणं नाही. मर्यादित, स्पष्ट आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना समजेल असे काही ठराविक मुद्दे घेऊन जनते समोर जावं. एकत्रित प्रयत्न करावेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्रित प्रयत्न केले. तिथे जी कमतरता असेल ती दुरुस्त करावी. आणि लोकांमध्ये आक्रमकपणे आपली भूमिका मांडावी, हे सूत्र घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीत जातोय. सध्या मी महाराष्ट्रात फिरतोय. लोकांना बदल हवाय, असं मला असं वाटतंय. आणि तो बदल आम्हा तिघांच्या दृष्टाने अनुकूल झाला तर, मी एक खात्री देतो काहीही झालं तरी आम्ही पाच वर्षे उत्तम चालणारं सरकार महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू. त्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मला स्वतःला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. चांगलं राज्य चाललं पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे एवढं एकमेव सूत्र आम्ही तिघेही घेऊन जाणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.