शरद पवार यांच्याकडून बारामतीतील उमेदवाराची घोषणा, वाचा बातमी

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. भोर येथील सभेत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर येथे सभेचं आयोजन केलं होतं.

या सभेतच शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. तसंच, संग्राम थोपटे यांनी आपल्यासोबत राहावं, शरद पवार पाठीशी असल्यानंतर विकास काय असतो, ते मी दाखवून देईन असंही पवार यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, मोदी फक्त गुजरातचा विचार करतात. ते इतर साधन संपत्ती हिसकावून गुजरातला नेतात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, पण इथले नुकसान करुन गुजरातला फायदा केला जातोय. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सत्तेचा दुरुपयोग करून तुरुंगात टाकलं. आज मी तुमच्यासमोर सुप्रियाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय. सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलकं आहे, अशी घोषणा पवार यांनी या सभेत केली.