महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारची कोंडी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गजर आहे. एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे, असे शरद पवार म्हणाले.
आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोनही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी सांगितले.