पंधराशे रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं महत्त्वाचं, शरद पवार यांची टीका

पंधराशे रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं महत्त्वाचं आहे असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच मोदी सरकार हे शेतकरी विरोधात आहे असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

धुळ्यात शेतकरी मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, आज काही लोक सांगतात आम्ही काम करो ना करू आम्ही आमच्या बहिणींना पंधराशे रुपये दिले. बहिणींचा सन्मान हा या देशांमध्ये प्रत्येक आनंद वाटणारा सन्मान आहे. पण आवश्यकता काय? असा सवार पवारांनी विचारला. तसेच तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचा. महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर कुठल्यातरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींवर अत्याचार झाला ही बातमी वाचायला मिळते. पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रु. पेक्षा आमच्या बहिणीची अब्रू वाचवणं त्यांना संरक्षण देणं, तिचं रक्षण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण त्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक सुरु आहे. असा मार्ग घेण्याचा निकाल जे कोणी घेतात त्यांच्याबद्दल काय भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे असेही पवार म्हणाले.

 

शेतकरी विरोधातले मोदी सरकार

आपल्या राज्यात काही भागांमध्ये उसाचे पीक घेतलं जातं. आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचा उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं असे पवार म्हणाले. उसापासूनपासून साखरनिर्मिती होते, मळीपासून इथेनॉल होतं आणि अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि मग शेतकऱ्याला उसाची किंमत ज्यादा देता येते. मोदी सरकार आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी उसातून विविध पूरक उत्पादनं घ्यायचं ठरवलं त्यावर बंधन घातली असे पवार म्हणाले. तसेच गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे असेही पवार म्हणाले.